डोक्यात फरशी घालून इसमाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:04+5:30
मद्यप्राशन करतांना ग्यानिरामने आपली बॅग चोरीला गेली ती शोधू असे जलीलला सांगितले. परंतु त्यांची बॅग चोरी झाली तेव्हा जलील त्याच ठिकाणी उपस्थित होता. म्हणून त्याची बॅग कुणी चोरून नेली याची माहिती त्याला होती. तरी बॅग शोधण्याचा ढोंग जलील करू लागला. बॅग शोधण्यासाठी दोघेही जयस्तंभ चौकात गेले.

डोक्यात फरशी घालून इसमाचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर येथील ग्यानिराम गोपीचंद कुथे (४२) हे कामासाठी गोंदियात आले होते. त्यांची बॅग आरोपीने चोरली. यात त्यांच्याशी वाद झाल्याने त्याच्या डोक्यात फरशीने तीनवेळा घाव घालून गंभीर जखमी केले. त्या इसमाचा उपचार घेतांना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी पहाटे ३.३० वाजता मृत्यू झाला.
बालाघाटच्या किरणापूरवरून मृतक ग्यानिराम गोपीचंद कुथे हे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कामानिमीत्त गोंदियाला बॅग घेऊन आले होते. जयस्तंभ चौकातून त्याच दिवशी रात्रीला ग्यानिरामची बॅग त्याच्याजवळून हिसकावून नेली. चोरट्याने त्याच्या हातातून बॅग हिसकावून नेल्यानंतर त्याने आपली बॅग शोधली. परंतु तो बॅग घेऊन जाणारा दिसला नाही. परिणामी रात्र झाल्याने ग्यानिरामने गोंदियातच रात्र काढली. \
२४ सप्टेंबरला सकाळ होताच ग्यानिराम गावाला जाण्यासाठी जयस्तंभ चौकातील रिक्षा स्टँडवर आला. तेथे आरोपी जलील शेख इस्राईल शेख उर्फ मालाधरी (४८) रा.शास्त्रीवॉर्ड गोंदिया हा भेटला. त्याला रेल्वे स्टेशनवर सोडून दे असे ग्यानिराम ने म्हटले. त्याला रेल्वे स्टेशनवर सोडून देण्यासाठी रिक्षा घेऊन तो निघाला.रस्त्यात ग्यानिराम व जलील यांच्यात संवाद होऊ लागला आणि त्या दोघांनी दारू पिण्याची योजना आखली. त्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केले. मद्यप्राशन करतांना ग्यानिरामने आपली बॅग चोरीला गेली ती शोधू असे जलीलला सांगितले. परंतु त्यांची बॅग चोरी झाली तेव्हा जलील त्याच ठिकाणी उपस्थित होता. म्हणून त्याची बॅग कुणी चोरून नेली याची माहिती त्याला होती. तरी बॅग शोधण्याचा ढोंग जलील करू लागला. बॅग शोधण्यासाठी दोघेही जयस्तंभ चौकात गेले. त्यावेळी ग्यानिरामच्या हातातून बॅग हिसकावणारा आरोपी राकेश चैतराम ठाकरे (३५) रा.गौशाला वॉर्ड गोंदिया हा तिथे दिसला.ग्यानिरामने त्याला पकडून माझी बॅग कुठे ठेवली असे बोलून धक्काबुक्की करून लागला. त्यावर राकेशने ती बॅग विवेक मंदिर शाळेच्या मागील भागात असल्याचे सांगितले. ती बॅग देतो चल म्हणून ग्यानिरामला जलीलच्या सायकल रिक्षात बसवून दोघांनी नेले. त्यावेळी त्या भागात कुणीच नसतांना फरशीने त्याच्या डोक्यात घाव घालून रक्तबंबाळ करून निघून गेले. ग्यानिराम रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना गोंदियाच्या जोगलेकर वॉर्डातील मुजीब हबीब बेग (३९) यांना तो बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला.
मुजीब यांनी अमित पटेल यांना फोन करुन त्यांना तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दिली. अमित पटेल यांनी घटनास्थळ गाठून ग्यानिरामला गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या घटनेसंदर्भात सुरूवातीला गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. परंतु उपचार घेतांना ग्यानिरामचा २५ सप्टेंबरच्या पहाटे ३.३० वाजता मृत्यू झाला. यासंदर्भात ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
आरोपीपर्यंत पोहचले पोलीस
मृतक ग्यानिरामला बॅग देतो म्हणून आरोपी राकेश ठाकरे व जलील शेख या दोघांनी विवेक मंदिर परिसरात घेऊन गेले. त्याच्या डोक्यावर फरशीने तीन वेळा डोक्यात घाव घालण्यात आले. ही सर्व घटना विवेक मंदिर शाळेच्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली. परिणामी आरोपीपर्यंत पोहचण्यात पोलिसांना या कॅमेऱ्याची मदत झाली.
१२ तासात आरोपीला अटक
या घटनेची साक्ष सीसीटीव्ही कॅमेरा देत असल्याने त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. २४ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास त्या दोघांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, नितीन सावंत, कैलाश गवते, राजू मिश्रा, रॉबीन साठे, विकास बेदक यांनी केली.