तलावांच्या दुरूस्तीतून वाढेल सिंचन
By Admin | Updated: November 29, 2014 23:22 IST2014-11-29T23:22:39+5:302014-11-29T23:22:39+5:30
तलावांच्या या जिल्ह्यात असलेले १४०० मामा तलाव जिल्हावासीयांसाठी वरदान आहेत. त्यांचे खोलीकरण, गाळ उपसा केल्यास या तलावांमध्ये चांगला जलसाठा होऊन जमिनीतील पाण्याची पातळीही वाढेल.

तलावांच्या दुरूस्तीतून वाढेल सिंचन
गोंदिया : तलावांच्या या जिल्ह्यात असलेले १४०० मामा तलाव जिल्हावासीयांसाठी वरदान आहेत. त्यांचे खोलीकरण, गाळ उपसा केल्यास या तलावांमध्ये चांगला जलसाठा होऊन जमिनीतील पाण्याची पातळीही वाढेल. यातून बऱ्याच प्रमाणात सिंचनाचे क्षेत्र वाढून जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी व्यक्त केला.
गेल्या साडेचार वर्षापासून जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. या कार्यकाळात जि.प.ने कोणकोणते उपक्रम, योजना राबविलेल्या आणि भविष्यासाठी काय योजना प्रस्तावित आहेत याबद्दल ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आतापर्यंतच्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त केले.
शिक्षण, आरोग्य, सिंचन, रस्ते, पाणी पुरवठा अशा सर्वच विषयांमध्ये उल्लेखनिय काम झाले आहे. त्याचे सकारात्मक बदलही त्या त्या क्षेत्रात पहायला मिळत आहे. आता १४०० मामा तलाव आणि लघु पाटबंधारे तलावांच्या दुरूस्ती व गाळ काढण्यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास सिंचनाच्या सोयी, जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास खूप मदत होईल. तलावांच्या दुरूस्तीसाठी निधी मिळण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याशिवाय राहिलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे, बंधाऱ्यांचा निधी खर्च करणे आणि नळ योजनेसाठी छोट्या गावांमध्ये सोलर पंपांसाठी निधी मिळविणे ही कामे पुढील काळात प्रस्तावित असल्याचेही शिवणकर यांनी सांगितले.
आतापर्यंत सिंचन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल सांगताना ते म्हणाले, रोहयो अंतर्गत पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या विहिरी खोदून देण्यात आल्या. जवळपास ३५ कोटी रुपयांचे बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे सिंचनाच्या सोयीसोबत पाण्याची पातळीही वाढली आहे. रस्ते बांधकामासाठी वर्ष २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हा नियोजन समितीतून ३ कोटी तर राज्य शासनाकडून १५ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र अजूनही अनेक रस्त्यांचे काम बाकी आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने राबविलेल्या गावची शाळा आमची शाळा प्रकल्पाच्या माध्यमातून शाळांचा दर्जा बराच सुधारला आहे. वर्गखोल्यांचे बांधकामही मोठ्या प्रमाणात झाले आहे.