देवरी : नागपूर सिंचन भवन येथे बुधवारी आयोजित सिंचन विभागाच्या बैठकीत सिंचन विभागाचे कार्यकारी संचालक मोहिते यांच्याशी चर्चा करुन विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्याची मागणी आ. सहषराम कोरोटे यांनी केली.
या बैठकीत आ. कोरोटे यांनी बेवारटोला, ओवारा, मानागड, पिपरिया या प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती व सिरपूर बांध येथील मनोहर सागर धरणाची पाणी साठवण क्षमतेत कशाप्रकारे वाढ करता येईल, या प्रकल्पातील विकासाकरिता निधी त्वरित उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याकरिता चर्चा करण्यात आली. बैठकीत देवरी तालुक्यातील नावागढ, सातबहिणी व मुरदोली यासारख्या अनेक सिंचन प्रकल्पाचे काम वन कायद्यामुळे प्रलंबित असल्याची माहिती आमदार कोरोटे यांनी कार्यकारी संचालक मोहिते यांना यावेळी दिली. या विषयावर मोहिते यांनी लगेच या संबंधात सर्वेक्षण करुन प्रलंबित सर्व प्रकल्प त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. बैठकीत गोंदिया मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कापसे, सिंचन विभागातील अभियंता सोनटक्के, वेमुलकोंडा व देवरी तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार उपस्थित होते. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राची पूर्ण अर्थव्यवस्था ही धान पिकावर अवलंबून आहे. या क्षेत्रातील सिंचन व्यवस्था अपुरी असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.