विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील कुणबीटोला आणि कोटजंभुरा परिसरातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे देण्याचे मंजूर करून सुरुवातीला दोनदा पाणी देण्यात आले. मात्र, आता ऐनवेळी पाटबंधारे विभागाने रब्बीसाठी पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे परिसरातील शेतकरी संकटात आले आहे. ५० एकरांतील रोवणी खोळंबली असून पाण्याअभावी पन्हे करपण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, शेतकरी संकटात आले असून रब्बीसाठी केलेला खर्च कसा भरून निघणार याची चिंता सतावीत आहे.
पुजारीटोला धरणातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या मोठ्या कालव्यातून लटोरी गावाकडे जाणारा छोटा कालवा गेला आहे. या कालव्यात कोटजंभुरा गावापर्यंत आठव्या आऊटलेटपर्यंत उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्याची मंजुरी सिंचन विभागाने दिली होती. त्यानुसार त्या ठिकाणी कालवा आडवा बांधण्यात आला. सुरुवातीला दोन वेळा पाणी सोडण्यात आले. त्यानुसार परिसरातील शेतकऱ्यांनी पन्हे टाकले तर नंतर दोन-तीन शेतकऱ्यांनी कसेबसे रोवणीचे काम पूर्ण केले; परंतु जेव्हा तिसऱ्यांदा कालव्याला पाणी सोडण्याची वेळ आली तेव्हा सिंचन विभागाने पाचव्या आउटलेटपर्यंतच पाणी अडविले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे पाणी देण्यास नाकारले आहे. परिणामी, ५० एकरांतील रोवणी संकटात आली आहे. या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मागील १५ दिवस सतत धावपळ केली; परंतु या शेतकऱ्यांची वेदना कुणीच ऐकण्यास तयार नाही. परिणामी, टाकलेले पन्हे पाण्याअभावी वाळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.