रिक्त पदांनी अडविले सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:40+5:302021-02-06T04:53:40+5:30
अंकुश गुंडावार सिंचन विभागातील ८० टक्के पदे रिक्त : २० टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांवर डोलारा गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून ...

रिक्त पदांनी अडविले सिंचन
अंकुश गुंडावार
सिंचन विभागातील ८० टक्के पदे रिक्त : २० टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांवर डोलारा
गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन निर्मितीत सिंचन विभागात मागील दोन तीन वर्षांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या पदांचा परिणाम होत आहे. दरवर्षी २० ते २५ हजार हेक्टर सिंचन निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असले तरी ते पूर्ण करण्यात सिंचन विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार १९८ हेक्टर लागवड क्षेत्र असून एकूण प्रकल्पीय सिंचन क्षमता २ लाख १३ हजार ५७५ हेक्टर आहे. यापैकी सध्या १ लाख १६ हजार ८७० सिंचन क्षेत्रात निर्मिती होत आहे तर ९६ हजार ७०५ हेक्टर सिंचन निर्मितीचे काम सुरू आहे. ७ मध्यम, २० लघु आणि ३८ मामा तलावांच्या माध्यमातून सिंचन निर्मिती केली जात आहे. सिंचन निर्मितीत वाढ करुन अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सिंचन विभागाकडून प्रयत्न केला जात असला तरी यात निधी आणि रिक्त पदांची समस्या येत आहे. जिल्ह्यातील सिंचन विभागात एकूण ८२६ पदे मंजूर आहेत. मात्र सद्यस्थितीत केवळ १६८ पदे भरली आहे. तब्बल ६५८ पदे रिक्त असल्याने याचा सिंचन निर्मितीच्या कामावर परिणाम होत आहे. रिक्त असलेल्या पदांमध्ये वर्ग १ ची १०, वर्ग २ ची ४५, वर्ग ३ ची ४८५ आणि वर्ग ४ ची ११८ पदे आहेत. ८० टक्के पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्यावर चार ते पाच विभागाचा पदभार आहे. भंडारा आणि नागपूर येथील अधिकाऱ्यांना पदभार सोपवून ही कामे केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्मितीच्या कामावर परिणाम होत आहे. ही पदे मागील तीन चार वर्षांपासून रिक्त असल्याने ६० हजारावर सिंचन निर्मितीचे काम रखडल्याची बाब पुढे आली असून याचा परिणाम जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर होत आहे.
.....
कोविडमुळे पदभरती संकटात
काेविडमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. खर्च कमी करण्यासाठी विविध विभागांची नोकर भरती बंद करण्यात आली तर कोविडच्या कमी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुध्दा कामे करण्यात आली. त्यामुळे हाच फार्म्युला कायम ठेवीत आता रिक्त पदे भरण्याचे शासनाकडून टाळले जात आहे.
......
जलसंपदा मंत्र्यांचे मौन
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंचनाचा आराखडा सादर करताना त्यांच्यासमोर रिक्त पदांमुळे सिंचन निर्मितीत अडचण येत असल्याची बाब लक्षात आणून दिली. मात्र रिक्त पदे भरण्याबाबत ठोस आश्वासन देण्याऐवजी कोविडचे कारण देत यावर मौन बाळगले. त्यामुळे ही ८० टक्के पदे भरण्याची शक्यता फार कमी आहे.
.....
सिंचनासह रिक्तपदांचा अनुशेष राहणार कायम
कोविड काळात कमी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुध्दा चांगले काम होऊ शकते ही बाब सिध्द झाली. त्यामुळेच आता शासनाने रिक्त असलेली पदे भरताना ती भरणे आवश्यकच आहे का याची सर्व बाजूने चाचपणी केल्यानंतरच ती भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सिंचनाच्या अनुशेषासह रिक्तपदांचा अनुशेष वाढण्याची शक्यता आहे.