नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारत राखीव बटालियन - २ व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - १५ गोंदिया हे नागपूर येथून गोंदिया येथे स्थलांतरित करण्यासाठी समादेशक तयार नाहीत. यासंदर्भात शासनाला खोटा पत्रव्यवहार करून दिशाभूल करत आहेत. जिल्ह्यातील नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी उभारण्यात आलेली ५५ कोटींची इमारत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी किंवा कामकाजासाठी तयार करण्यात आलेली नाही तर ती अधिकाऱ्यांसाठी केवळ ‘पिकनिक स्पॉट’ बनली आहे.
भारत राखीव बटालियन - २ व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - १५ या गटाचे बांधकाम बिरसी येथे ५५ कोटी रूपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. गटाचा ताबा १८ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आला आहे. गट सुरक्षेकरिता १ कंपनी १ महिन्याकरताच पाठविण्यात आली आहे. या कंपनीला १ महिना पूर्ण झाल्यावर आपसी बदलीकरिता दुसरी कंपनी पाठविण्यात आली. त्या कंपनीला नागपूर येथे परत पाठविण्यात आले आहे. परंतु, आतापर्यंत हा गट २७ जानेवारी २०१३पासून नागपूर येथेच आहे. गोंदिया येथे या बटालियनची स्थापना सन २००९मध्ये झाली आहे. ६७५ पोलीस शिपायांची भरती करण्यात आली आहे. येथे ही बटालियन ठेवायला जागा नसल्याने २ वर्ष हिंगाली येथे ठेवण्यात आली. नंतर हिंगालीचे अंतर गोंदियावरून जास्त असल्याने नागपूर येथे सन २०१३मध्ये हलविण्यात आली. तेव्हापासून ही बटालियन नागपुरातच आहे.
आता येथील बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा या बटालियनचे समादेशक जावेद अन्वर गोंदिया येथे ही बटालियन आणण्याकरिता टाळाटाळ करत आहेत. या मागचा हेतू फक्त त्यांचे घर नागपूर येथे असल्याने घरून नोकरी करण्याच्या हव्यासापायी ते बटालियन गोंदियाला हलवत नाहीत, असे म्हटले जाते. आतापर्यंत त्यांनी ही बटालियन हलविण्याबाबत वरिष्ठांना चुकीची माहिती व दिशाभूल करणारे प्रस्ताव शासनाला पाठवले आहेत. जावेद अन्वर मे २०१७पासून याचठिकाणी असून, दुसऱ्या ठिकाणी त्यांची बदली झालेली नाही. सन २०१४ मध्ये अन्वर यांच्याकडे १० महिने समादेशक पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना या गटाचे बांधकाम नागपूर येथे करण्यात यावे. बिरसी हे अंतर गोंदियावरुन २५ किलोमीटर असून, नक्षलग्रस्त आहे व त्याठिकाणी कोणतेही गाव नाही, असे पत्र त्यांनी शासनाला पाठवले होते. नागपूर येथील गट - ४च्या परिसरातील जागेवर बांधकाम करण्यात त्या जागेचे ना हरकत प्रमाणपत्रसुध्दा वरिष्ठांना त्यांच्याकडून पाठविण्यात आले होते. यामुळे महिन्यातून अधिकारी १-२ वेळा दौरा करून पिकनिक स्पॉटसारख्या भेटी देत आहेत.
बॉक्स
पगार बिलासाठी ५० हजारांचा भुर्दंड
या बटालियनचे कोषागार कार्यालय गोंदिया येथे आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन गोंदिया येथूनच होत आहे. मार्च २०२० कोरोना काळापासून ते आतापर्यंत कोषागार येथे नागपूरवरुन बिल पोहोचविण्याचे काम शासकीय वाहन टाटा सुमोने केले जात आहे. त्याला महिन्याचा ५० हजार रुपयांचा इंधन खर्च होत आहे. त्याचा भुर्दंड शासनाला बसत आहे. गोंदिया येथील बांधकाम पूर्ण झाले असूनही समादेशक कार्यालय नागपूर येथेच आहे.