घोटाळ्याची चौकशी सुरु
By Admin | Updated: May 8, 2015 01:04 IST2015-05-08T01:04:22+5:302015-05-08T01:04:22+5:30
येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत घोटाळा करण्यात आल्याची बाब समोर आली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे.

घोटाळ्याची चौकशी सुरु
काचेवानी : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत घोटाळा करण्यात आल्याची बाब समोर आली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करुन घोटाळा करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले असले तरी या प्रकरणाची वास्तविकता तपासाअंती समोर येणार आहे. काही शेतकरी या प्रकरणाला सत्यतेचे रुप देत आहेत. तर काही शेतकरी निराधार व राजनितिक षडयंत्राचे रुप देण्यात आल्याचे सांगत आहेत.
काचेवानी सेवा सहकारी संस्थेत अध्यक्ष पदावर १० वर्षापुर्वी पासून कार्यरत असणारे आर.एस.एस. चे तिरोडा तालुका कार्यवाह उमाशंकर चौकशी यांनी शेतकऱ्यांना माहिती न देता खोटे प्रस्ताव तयार करुन आणि खोट्या सह्या करुन शेतकऱ्यांच्या नावे पिक कर्ज घेवून करोडो रुपयांची उचल करुन स्वखर्चात आणल्याचा आरोप शेकडो शेतकऱ्यांनी करून सहकार क्षेत्र आणि मंत्रालया पर्यंत तक्रारी केलेल्या आहेत.
तक्रारीच्या आधारावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या कर्ज विभागात कार्यरत कर्मचारी सुरेश टेटे आणि वालदे यांनी चौकशी सुरु केली असून ग्रा.पं. कार्यालयात शेतकऱ्यांचे गऱ्हाने ऐकून घेण्यात आले आहेत.
त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. लवकरच त्यांच्याकडूनही प्रकरणाची तपासणी होणार असल्याची माहिती विश्वस्त सुत्रांनी दिली आहे. अध्यक्ष चौधरी यांनी, तत्कालीन संख्या सचिव बारापात्रे यांच्या साठगाठिने १४० ते १५० शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज दाखवून तीन कोटींचा गैरव्यवहार केल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. वरिष्ठांना केलेल्या तक्रारीत सांगण्यात आले की, वर्तमान संस्था सचिव पटले यांनी ३१ आॅक्टोंबर २०१४ ला वसुलीचे नोटीस बजावले तेव्हा बोगस कर्ज काढण्यात आले आणि काही शेतकऱ्यांनी दिलेले कर्ज बँकेत जमा करण्यात आले नसल्याचे लक्षात आले.आरोपकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले की, सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यां व्यतिरिक्त कर्ज देत नाही.
मात्र कमला प्रभूदास पारधी यांच्या नावे शेती किंवा घर नसताना ३९ हजार ९२४ रुपये कर्ज दाखविण्यात आले आहे. त्यात लक्ष्मीचंद चौधरी यांनी २०१० मध्ये १० हजार ८०० रुपयांचे कर्ज घेतले होते. यांना ४१ हजार २२८ रुपये चे नोटीस बजावण्यात आले आहे.
राजकुमार कटरे यांनी २००९ मध्ये २६ हजारांचे कर्ज घेतले. त्यांच्यावर ६२ हजार ७०९ रुपयांचे कर्ज काढण्यात आले व त्यांच्यावर ६९ हजार १० रुपयांचे कर्ज दाखविण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त दिलीप कटरे यांच्या नावाने २३ हजार ३८४ रुपयांचे कर्ज दाखविण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार १६ जानेवारी रोजी तालुका उपनिबंधक, ३० मार्च रोजी तिरोडा पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक, खासदार नाना पटोले आणि तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)