कारंजा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:28+5:302021-02-05T07:45:28+5:30

गोंदिया : तालुक्यातील कारंजा ग्रामपंचायतीमध्ये २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत साहित्य खरेदी तसेच इतर कामांत लाखो रुपयांचा ...

Investigate corruption in Karanja Gram Panchayat | कारंजा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा

कारंजा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा

गोंदिया : तालुक्यातील कारंजा ग्रामपंचायतीमध्ये २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत साहित्य खरेदी तसेच इतर कामांत लाखो रुपयांचा घोळ केल्याची बाब माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या माहितीत पुढे आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून घोळ करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कारंजा येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.

गावकऱ्यांनी माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या माहितीत चौदावा वित्त आयोग, सामान्य निधी,पाणीपट्टी कर निधीअतंर्गत केलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा घोळ करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. यात प्रामुख्याने बोगस मजुरांच्या नावाने वेतन काढण्यात आले. तर एकाच व्यक्तीने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कामे केल्याचे दाखवून मजुरी काढण्यात आली आहे. मोरेश्वर हत्तीमारे यांच्या मिक्सर मशीनचे बिल जोडले असून या बिलामध्ये तफावत आहे. चार महिन्यांच्या कालावधीत १७८ ट्रिप नालीचा मलमा फेकल्याचे व बोगस मजुरांच्या नावे वेतन काढले आहे. तसेच ट्रॅक्टरच्या दरातसुध्दा तफावत आहे. नाली व गटारे उपसणे, पेटीं, डिझेल, पेट्रोल आणि मास्क हॅन्डवाॅश खरेदीतसुध्दा आर्थिक घोळ केल्याचा आरोप आहे. हळदी- कुंकू कार्यक्रमाकरिता १३०० प्लेट खरेदीचा घोळ तसेच इतर आठ ते दहा प्रकारच्या कामात घोळ झाल्याची बाब पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकाराची सक्षम अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशी करून यातील दोषीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यानी तक्रारीत केली आहे. माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या माहितीची कागदपत्रे आणि ४०० गावकऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र पालकमंत्री अनिल देशमुख, आ. विनोद अग्रवाल, आ. परिणय फुके, जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांना दिले आहे.

Web Title: Investigate corruption in Karanja Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.