जिल्हा सीमेवर अवैध धंद्यांना ऊत
By Admin | Updated: November 23, 2014 23:22 IST2014-11-23T23:22:43+5:302014-11-23T23:22:43+5:30
गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या केशोरी पोलीस स्टेशनअंतर्गत गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. पोलिसांच्या छत्रछायेत या धंद्यांना अधिक बळकटी आल्याची चर्चा आहे.

जिल्हा सीमेवर अवैध धंद्यांना ऊत
विद्यार्थी मटक्याच्या आहारी : पोलीस विभागही अनभिज्ञ
अर्जुनी/मोरगाव : गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या केशोरी पोलीस स्टेशनअंतर्गत गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. पोलिसांच्या छत्रछायेत या धंद्यांना अधिक बळकटी आल्याची चर्चा आहे.
प्राप्त माहितीनुसार, केशोरी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या राजोली, भरनोली, इळदा, परसटोला या परिसरात राजरोसपणे मटक्याचा धंदा फोफावला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा येथील एक व्यावसायीक जिल्हा सीमा ओलांडून येथे अवैध व्यवसाय करीत असल्याचे या परिसरात बोलल्या जात आहे. हा परिसर नक्षलग्रस्त, आदिवासी व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात आदिवासींची संख्या अधिक आहे. बड्या व्यक्तींचा कित्ता गिरवत अनेक शाळकरी विद्यार्थी सुध्दा मटक्याच्या आहारी गेल्याचे सांगण्यात येते. कुरखेड्याच्या एका व्यापाऱ्याने या कामात स्थानिक व काही आपल्या नजीकच्या लोकांना या कामी लावले आहे. या व्यवसायात विशेषत: रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनांचा वापर केला जात आहे. पोलीस मात्र यापासून अनभिज्ञ आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. गोंदिया जिल्ह्याच्या याच सीमावर्ती भागातून गडचिरोली व गोंयिदा या दोन्ही जिल्ह्याच्या व्यावसायीकांकडून मोठ्या प्रमाणावर कुरखेडा परिसरात दारूचा पुरवठा होत असल्याचे बोलल्या जाते. गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून कुरखेडा परिसरात दारू नेली जाते. कुरखेडा परिसरातील शौकिनांची या तस्करीतून तहान भागते. त्याठिकाणी दारूची किंमत मात्र अधिकची मोजावी लागत असल्याचे समजते. या कामात काही बडे व्यावसायिक गुंतले आहेत.
अवैध दारूवर नियंत्रण ठेवणारा उत्पादन शुल्क विभाग मात्र या गोरखधंद्यावर नियंत्रण ठेवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. अनेकदा जिल्हा पोलिसांनी अवैध दारूचा पुरवठा करणाऱ्या आरोपींना गजाआड केल्याच्या घटना घडल्या आहेत.
परंतु दारूवर नियंत्रण ठेवणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाने या परिसरात कितीवेळा दारू पकडली, हा संशोधनाचा विषय आहे. पोलिसांच्या छत्रछायेतच अवैध धंद्यात वाढ होत असल्याची चर्चा आहे. कुंपणच शेत खात असल्याचा हा प्रकार आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)