ग्रंथभेटीतून कर्तव्याचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 01:52 IST2016-09-02T01:52:55+5:302016-09-02T01:52:55+5:30
राज्य शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित येथील जेष्ठ ग्रंथमित्र अॅड. डॉ. श्रावण उके यांनी अमृत महोत्सवी वाढदिवशी

ग्रंथभेटीतून कर्तव्याचा परिचय
ग्रंथमित्र उके यांचा उपक्रम : अमृत महोत्सवानिमित्त वाचनालयांना ग्रंथांची भेट
देवरी : राज्य शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित येथील जेष्ठ ग्रंथमित्र अॅड. डॉ. श्रावण उके यांनी अमृत महोत्सवी वाढदिवशी शासनमान्य १८ ग्रंथालयांना १२५ ग्रंथ भेट देऊन आपल्या कर्तव्याचा परिचय दिला. हा सोहळा रविवारी (दि.२८) मोठ्या उत्साहात येथे पार पडला. यानिमित्त डॉ. उके लिखीत ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
या अमृत महोत्सवाची सुरूवात जेष्ठ कवी शिवानंद पाठक यांच्या काव्यपंक्तीने करण्यात आली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी खेमेंद्र बोपचे, नगराध्यक्ष सुमन बिसेन, समाज कल्याण मंत्रालयाचे माजी उपसचिव उत्तम शिंगाडे, भदंत महापंत, महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सविता पुराम, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, सामाजिक कार्यकर्ता शांतीलाल जैन, विष्णुप्रसाद अग्रवाल, नगरसेवक यादोराव पंचमवार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश चांदेवार, डॉ. अनिल चौरागडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना अॅड. श्रावण उके यांचा जीवनावर आधारीत चित्रपट दाखविण्यात आला. दरम्यान डॉ. उके लिखीत ‘व्यक्ती आणि कार्य’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. उके यांनी वयाची पंच्याहत्तरावी गाठल्या निमित्त त्यांच्या कुटूंबीयांनी तालुक्यातील १६ आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील २ अशा एकूण १८ शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना मराठी भाषेतील ७५ ग्रंथ आणि मुंबईच्या लाईट इनर लाईट या संस्थेच्यावतीने इंग्रजी भाषेतील ५० ग्रंथ असे एकूण १२५ ग्रंथाचा संच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचा शतकात्तर रौप्य महोत्सव निमित्त भेट म्हणून देण्यात आले.
संचालन सपना बन्सोड यांनी केले. प्रास्ताविक डॉ. उके यांचे नातू हर्षवर्धन भिमटे यांनी मांडले. आभार शारदा उके यांनी मानले. कार्यक्रमाला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील लेखक, कवी, साहित्यीक व ज्यांची पुस्तके प्रकाशित झाली अशा व्यक्तींसह समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती, अधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)