आंतरजातीय जोडपे अडकले विवाहाच्या बंधनात
By Admin | Updated: November 29, 2014 01:46 IST2014-11-29T01:46:05+5:302014-11-29T01:46:05+5:30
प्रेमविवाहाला अजूनही समाजमनाची मान्यता दिसत नाही. दोन मित्र-मैित्रणीच्या विवाहाला जन्मदात्या आईवडिलांचा विरोध असतो.

आंतरजातीय जोडपे अडकले विवाहाच्या बंधनात
बोंडगावदेवी : प्रेमविवाहाला अजूनही समाजमनाची मान्यता दिसत नाही. दोन मित्र-मैित्रणीच्या विवाहाला जन्मदात्या आईवडिलांचा विरोध असतो. मात्र त्यांच्या प्रेमाच्या शक्तीने आणि स्थानिक महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने ते आंतरजातीय प्रेमीयुगुल अखेर विवाहबंधनात अडकले. देवी गंगाजमुना मातेच्या साक्षीने त्या युगुलाचे शुभमंगल घडवून आणले.
येथील शिवकुमार आनंदराव मेश्राम या २५ वर्षाच्या युवकाचे गावातीलच समाजाव्यतिरिक्त असलेल्या निराशा शामराव मेश्राम या २१ वर्षीय युवतीशी दोन वर्षापूर्वी प्रेमसंबध जुळले. तारुण्यात वाढलेल्या या युवा जोडप्यांचे प्रेम बहरु लागले. पाहता-पाहता त्या दोघांनी प्रबळ निश्चय करुन समाजात पती-पत्नी म्हणून वावरण्याचा निर्णय घेतला. दोघेही विभिन्न जातीचे असल्याने त्यांच्या वैवाहिक कार्यक्रमाला घरच्या लोकांकडून विरोध केला. आपण दोघे एकत्र कसे येणार त्या विचाराने त्या आंतरजातीय प्रेमविरांनी माय बापाला कोणताही सुगावा लागू न देता गावातून पोबारा केला. चार-पाच दिवस त्यांनी गाव सोडून घालविले. अखेर मुलाच्या बापाने पोराची बाजू घेतली. दोघांचा शोध घेऊन त्यांना गावात आणले. प्रेमीयुगुल असल्याने पदाधिकाऱ्यांनी दोघांची संमती घेऊन विवाहाची तयारी केली. मॉ गंगा जमुना मातेच्या देवस्थान परिसरात गावातील प्रतिष्ठित नागरिक मोरेश्वर बनापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली वैवाहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरजातीय प्रेमीयुगुलाच्या हातात लग्नाची बेडी घालण्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार ठवरे, सरपंच वर्षा फुल्लुके, निमंत्रक मंगला रामटेके, मु.धो. मानकर, दिनेश फुल्लुके, रत्नाकर बोरकर, तुलशीदास बोरकर, कुकसू मेश्राम, प्रमोद पाऊलझगडे, पतीराम मेश्राम, शांतीप्रकाश पालीवाल, वर्षा लोणारे, शेवंता मानकर, प्रतिभा बोरकर, प्रीतमकुमार वाढले, शालीक बोरकर, दयाराम झोळे, डॉ. कुंदन कुलसुंगे, राजेंद्र मेश्राम, कपीला बोरकर, दुर्गा झोळे यांनी सहकार्य केले.
दोन वर्षापासून प्रेमसागरात न्हाऊन निघालेल्या या आंतरजातीय प्रेमीयुगुलांना हिंदी विवाह पद्धतीने रत्नाकर बोरकर यांनी मंगलाष्टके गाऊन पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधले. यावेळी मुलाचे मामा म्हणून रामेश्वर मेश्राम तर मुलीचे मामा म्हणून राधेशाम झोळे यांनी भूमिका बजावून अंतरपाठ धरला.
लीला बोकर, शांता लंजे यांनी सुहासिनीची जबाबदारी पार पाडली. भूमेश्वर लंजे यांच्या घरुन उफलीच्या निनादात व फटाक्याच्या आतिषबाजीने प्रेमवीर शिवकुमारची वरात नाचत-गाजत विवाहस्थळी मातेच्या मंदिरात आणली.
लपून-चोरून भेटणाऱ्या त्या दोन आंतरजातीय प्रेमवीरांना पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधून गुण्यागोविंदाने एकत्र राहून सांसारिक जीवन जगण्याची संधी तंटामुक्त समितीने मिळवून दिली.
प्रेमीयुगुलांचे जीवन सुखी व्हावे यासाठी आशीर्वाद देण्यासाठी संपूर्ण गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. विवाहाप्रसंगी मुलाचे सोयरे उपस्थित होते. मुलीचे नातलग विवाहापासून अलीप्तच राहीले. उपस्थितांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
नवदाम्प्त्यांना गावकऱ्यांकडून संसारपयोगी वस्तू भेटी देण्यात आल्या. किशोर शहारे, दिपक, राष्ट्रपाल ठवरे, शेखर शहारे, भूमापती लंजे यांनी व्यवस्था सांभाळली. यशस्वीतेसाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)