‘बॅग लिफ्टींग’ करणारी आंतरराज्यीय टोळी अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST2021-09-24T04:34:25+5:302021-09-24T04:34:25+5:30
गोंदिया : गोरेगाव व डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या ‘बॅग लिफ्टींग’च्या घटनांतील आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी ...

‘बॅग लिफ्टींग’ करणारी आंतरराज्यीय टोळी अडकली
गोंदिया : गोरेगाव व डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या ‘बॅग लिफ्टींग’च्या घटनांतील आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी टोळीतील तिघांना बुधवारी (दि. २२) पकडले असून, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
गोरेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून मुरदोली येथील शेतकरी जियालाल फुलीचंद कटरे (७१) यांनी धानाचे २२ हजार रूपये काढले होते. यातील ५०० रूपये त्यांनी नातू अभिषेकला मोबाईल रिचार्जसाठी दिले व २१ हजार ५०० रूपये, पासबुक, आधारकार्ड प्लास्टिकच्या थैलीत टाकून ते बँकेच्या बाहेर बसले होते. यावेळी निळा शर्ट व काळी पँट घातलेला एक व्यक्ती त्यांच्या हातातून थैली घेऊन पसार झाला. यावेळी दुर्गा चौकात फिक्स पॉईंट ड्युटीवर असलेले हवालदार तिलगाम यांनी बँकेकडे धाव घेतली व पळून जात असलेल्या चोरट्यांच्या एका साथीदाराला लोकांच्या मदतीने पकडले. त्याचे दोन साथीदार दुचाकीने तिरोडाच्या दिशेने पळाल्याचे गोरेगावच्या ठाणेदारांना सांगितल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांच्या सहकार्याने नाकाबंदी केली. यात पोलिसांनी दोन दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये दीपककुमार उर्फ राहुल जीवनलाल खंजर (२६), विरेंद्र जागरनाथ कुमार (३७) व राजप्रतापसिंग कुमार (३९, रा. दिवानपूर, छत्तीसगड) यांचा समावेश आहे.
-------------------------
चोरीतील रोख, दुचाकी व मोबाईल केले जप्त
चोरट्यांनी गोरेगाव येथील २१ हजार ५०० रूपयांच्या चोरीसह १८ सप्टेंबर रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम परसोडी येथे १२ हजार रूपयांची चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन्ही चोरीतील एकूण ३३ हजार ५०० रूपये, चोरीसाठी वापरलेल्या व बनावट नंबरप्लेट असलेल्या २ दुचाकी व ५ मोबाईल जप्त केले आहेत.