अपघात विमा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ‘झटका’
By Admin | Updated: February 28, 2015 01:06 IST2015-02-28T01:06:10+5:302015-02-28T01:06:10+5:30
टॅ्रक्टर अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा विमा दावा दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने फेटाळला.

अपघात विमा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ‘झटका’
गोंदिया : टॅ्रक्टर अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा विमा दावा दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने फेटाळला. त्यावर सदर शेतकऱ्याच्या पत्नीने ग्राहक न्यायमंचात धाव घेवून आपल्या हक्काची विमा रक्कम एक लाख रूपये व नुकसानभरपाई मिळवून घेतली.
पुष्पा लालचंद कावरे रा. बुद्धुटोला (ता. व जि. गोंदिया) असे तक्रारकर्तीचे नाव आहे. तिचे पती लालचंद प्रेमलाल कावरे यांच्या मालकीची बुद्धुटोला येते ०.२० हेक्टरे शेतजमीन आहे. १४ जून २०१० रोजी लालचंद यांचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला व भादंविच्या कलम २७९,३३७, ३०४ अ नुसार रावणवाडी पोलीस ठाण्यात नमूद आहे.
पतीचा अपघाती मृत्यू झाल्याने पुष्पाने संपूर्ण कागदपत्रांसह ६ डिसेंबर २०१० रोजी दि युनायटेड इन्शुरंस कंपनीकडे शेतकरी अपघात विम्याचा अर्ज केला. परंतु तो फेटाळला गेला. तिने पुन्हा अॅड. सी.जे गजभिये यांच्या मार्फत अर्ज केला. परंतु विमा कंपनीने कसलेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तिने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली.
यानंतर मंचामार्फत नोटीस विरूद्ध पक्षांना पाठविण्यात आल्या. विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबात, लालचंद कावरे यांचा मृत्यू १४ जून २०१० रोजी झाला. या दाव्याचा विमा कालावधी १५ आॅगस्ट २००९ ते १४ आॅगस्ट २०१० असून ९० दिवसांचा वाढीव कालावधी म्हणजे १४ नोव्हेंबर २०१० होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत कबाल नागपूर कार्यालयास ६ आॅगस्ट २०११ रोजी म्हणजे पॉलिसी संपल्यावर एक वर्षाने प्राप्त झाला. तो प्रस्ताव कबाल नागपूर मार्फत युनायटेड इंडिया विमा कंपनीला ८ आॅगस्ट २०११ रोजी पाठविण्यात आला. मात्र सदर दावा नामंजूर केल्याचे १७ एप्रिल २०१२ रोजी पत्रान्वये कळविले, असे जबाबात म्हटले.मात्र तक्रारकर्ती पुष्पा कावरेने सर्वच कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केली होती. तसेच वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायमंचाने कारणमिमांसा केली.
पुष्पाची त्यावेळची मानसिक स्थिती, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लागलेला वेळ व कुटुंबातील एकमेव सज्ञान व्यक्ती या बाबींचा विचार करून न्यायमंचाने विमा दावा दाखल करण्यासाठी लागलेला विलंब संयुक्तिक कारण ठरविले. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकानुसार ९० दिवसानंतरही दावा दाखल केला जावू शकतो व मंजूर होण्यास पात्रही असतो. तिने दाखल केलेले पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, एफआयआर, पंचनामा यावरून अपघाती मृत्यू सिद्ध होते. शिवाय तिने अर्ज करून व व्ययक्तिकरित्या विचारणा करूनही कंपनी व कंपनीच्या ब्रोकरने टाळाटाळ करून मानसिक त्रास देवून परत पाठविले. त्यामुळेच विमा दावा प्रलंबित असल्याचे मंचाच्या निदर्शनास आले.
ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने सदर तक्रार अंशत: मान्य केली. मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये विमा दावा दाखल केल्याच्या तारखेपासून दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून १० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दि युनायटेड इंडिया इन्शुरंस कंपनीला दिला. (प्रतिनिधी)