गोंदिया : पक्षी निरीक्षणासाठी गोंदिया तालुक्याच्या पसरवाडा येथे तयार करण्यात आलेला टॉवर (मनोरा) अत्यंत तकलादू उभारण्यात आला आहे. टॉवरच्या वर दोन व्यक्ती चढताच तो डोलू लागतो. अशा टॉवरच्या बांधकामामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.पक्ष्यांसाठी स्वर्ग ठरू पाहणाऱ्या गोंदिया तालुक्याच्या परसवाडा, झिलमिली व आमगाव तालुक्याच्या दहेगाव येथे २० हजारांपेक्षा अधिक विदेशी पक्षी व सारसांनी आपला डेरा घातला आहे. या तिन्ही ठिकाणी पर्यटनाच्या मोठ्या संधी लक्षात घेवून या स्थळांना ‘टुरिस्ट पॅलेस’च्या स्वरूपात विकसीत करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. भ्रमंतीसाठी येणारे पर्यटक व निसर्ग प्रेमींना निरीक्षणासाठी परसवाडा, झिलमिली व दहेगाव या तिन्ही ठिकाणी टॉवर्स (मनोरे) उभारण्यासाठी प्रत्येकी पाच लाख ६० हजार रूपयांप्रमाणे एकूण १६ लाख ८० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. जिल्हा पर्यटन समितीने या क्षेत्रांमध्ये टॉवर बांधकामाची जबाबदारी वनविभागाकडे सोपविली व निधीसुद्धा उपलब्ध करून दिला. सर्वप्रथम गोंदिया तालुक्याच्या परसवाडा येथे पहिल्या टॉवरचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य उपयोगात आणल्यामुळे आता काही दिवसातच हे टॉवर जमिनीपासून उखडू लागले आहे. गुणवत्तेबाबत विचार केल्यास, लोखंडी मोठ्या चादरीचा उपयोग न करता पातळ टिनाचा टॉवरच्या वरील ठिकाणी उपयोगात आणण्यात आले. टॉवरवर कमीत कमी दोन व्यक्ती पोहचताच ते हलू लागतात.पसरवाडा वन विकास समितीने या लिखीत निकृष्ट बांधकामाची तक्रार वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांच्याकडे केली. याची माहिती उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांना मिळताच त्यांनी याबाबत पुष्टी केली. कंत्राटदाराला देय असलेली रक्कम थांबविण्यात येईल तसेच दुसऱ्या एजंसीकडून उत्तम दर्जाचे टॉवर तयार करण्यात येईल, असे त्यांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)
निरीक्षण ‘टॉवर’ तकलादू
By admin | Updated: January 24, 2015 01:19 IST