वरून कीर्तन आतून तमाशा

By Admin | Updated: November 15, 2014 22:48 IST2014-11-15T22:48:21+5:302014-11-15T22:48:21+5:30

शहरवासीयांच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नसलेल्या गोंदिया नगर पालिकेने स्वच्छतेचा विषय अजूनही गांभिर्याने घेतलेला नाही. त्यामुळे आठ-आठ दिवसांपेक्षा अधिक काळापासून कचऱ्याचे

From the inside kirtan inside the spectacle | वरून कीर्तन आतून तमाशा

वरून कीर्तन आतून तमाशा

न.प. प्रशासन ढिम्मच : म्हणे नगरसेवकांच्या इशाऱ्यावर चालते काम!
गोंदिया : शहरवासीयांच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नसलेल्या गोंदिया नगर पालिकेने स्वच्छतेचा विषय अजूनही गांभिर्याने घेतलेला नाही. त्यामुळे आठ-आठ दिवसांपेक्षा अधिक काळापासून कचऱ्याचे ढिगारे अनेक ठिकाणी जसेच्या तसे पडून आहेत. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर काही नगरसेवकांनी आपल्या वॉर्डांच्या सफाईकडे लक्ष देणे सुरू केले असले तरी नगर परिषद प्रशासन आणि आरोग्य विभाग मात्र अजूनही ढिम्मच आहे. नगरसेवक सांगतील तिथे स्वच्छता करण्यास आम्ही प्राधान्य देतो, असे म्हणून आरोग्य विभाग आपण केवळ नगरसेवकांच्या इशाऱ्यावरच काम करतो, हे दाखवून देत आहे.
गोंदिया शहरात स्वच्छतेसाठी एकूण ६ झोन पाडण्यात आले आहेत. त्यावर ५ आरोग्य निरीक्षकांचे नियंत्रण आणि देखरेख असते. सकाळी ६.३० वाजतापासून स्वच्छता विभागाची ड्युटी सुरू होते. नगर परिषदेच्या रेकॉर्डनुसार नगर परिषदेचे ५ ट्रॅक्टर आणि कचरा उचलण्यासाठी दिलेल्या कंत्राटदाराचे ५ ट्रॅक्टर दररोज सकाळी शहराच्या १० वॉर्डात कचरा उचलण्यासाठी निघतात. नगर परिषदेच्या २७१ सफाई कामगारांनी नाल्यांमधून काढून काठावर लावलेला कचरा, आणि रस्ते झाडून ठिकठिकाणच्या कंटेनरमध्ये जमा केलेला कचरा दररोज १० ट्रॅक्टरमधून उचलला जात असल्याचे नगर परिषद सांगत आहे.
मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. शहरातून फेरफेटका मारल्यानंतर १० पैकी २ ट्रॅक्टरही कचरा दररोज उचलला जातो की नाही, अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.
विशेष म्हणजे प्रत्येकी ४ वॉर्डाच्या एका प्रभागात दररोज स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक जाते. मात्र ते संपूर्ण वॉर्डाची स्वच्छता करण्याऐवजी आधी नगरसेवकाच्या दारी हजेरी लावतात. ते सांगतील तिथेच आणि तेवढीच साफसफाई केली म्हणजे आपली ड्युटी संपली, असा त्यांचा भ्रम असतो. जे नगरसेवक सक्रिय आहेत ते आपल्या संपूर्ण वॉर्डाची स्वच्छता करून घेतात. मात्र जे नगरसेवक स्वत:च उदासीन आहेत किंवा ज्यांना आपल्या घराभोवतालच्या परिसराशिवाय दुसऱ्या परिसराबद्दल आस्था नाही त्यांच्या वॉर्डातील नागरिकांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील पाच आरोग्य निरीक्षकांपैकी तीन पूर्णवेळ कार्यरत आहेत, तर दोन प्रभारी आहेत. परंतू कोणत्याही आरोग्य निरीक्षकाचे आपल्या कार्यक्षेत्राकडे लक्ष नाही.
बाई गंगाबाई रुग्णालयाबाहेरील परिसरात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याबद्दल तेथील साफसफाईची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य निरीक्षकाला विचारणा केली असता त्याने सांगितले की, त्या ठिकाणी असलेला कचऱ्याचा कंटेनर खराब झाला आहे. त्यामुळे घंटागाडीवाले तिथे गोळा केलेला कचरा आणून टाकतात. हा कचऱ्या कधी उचलला होता असे विचारले असता, १०-१२ दिवसांपूर्वीच तर उचलला होता, असे उत्तर त्याने दिले. यावरून १०-१२ दिवस कचरा तिथे पडून असणे यात नवीन काहीच नाही, असे आरोग्य निरीक्षकाच्या म्हणण्यावरून दिसून येते.
विशेष म्हणजे नगर परिषदेकडे असलेल्या फिरस्ती घंटागाड्यासुद्धा गायब आहेत. एकूण ८० घंटागाड्यांपैकी ५० गाड्या चालू स्थितीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात तेवढ्याही गाड्या चालू स्थितीत नाहीत. कोणत्याही वॉर्डात घंटागाडीवाले दररोज फिरताना दिसत नाहीत. तरीही त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. असे असताना आरोग्य विभाग मात्र सर्वकाही आॅल ईज वेल असल्याचे भासवून आपल्या उदासीनतेचा परिचय देत आहे. शहरातील गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी अजून नगर परिषदेकडे डम्पिंग यार्ड नाही. स्मशानभूमीजवळील परिसरात उघड्यावर हा कचरा टाकल्या जातो. त्यातून पसरणाऱ्या जीवजंतूंमुळे रोगराई पसरते. परंतु त्याच्याशी न.प. प्रशासनाला काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: From the inside kirtan inside the spectacle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.