पदाधिकाऱ्यांच्या गैरकृत्याची चौकशी थंडबस्त्यात
By Admin | Updated: October 28, 2015 02:12 IST2015-10-28T02:12:28+5:302015-10-28T02:12:28+5:30
गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षानी केलेल्या गैरकृत्याची चौकशी अद्याप करण्यात आली नाही.

पदाधिकाऱ्यांच्या गैरकृत्याची चौकशी थंडबस्त्यात
रावणवाडी : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षानी केलेल्या गैरकृत्याची चौकशी अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीची जिरवाजिरव होत असल्याचा आरोप केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शासनाने गरीब, निराधार, बेघर व गरजू नागरिकांना सन्मानाचे जीवन जगण्याकरिता राज्यात इंदिरा आवास व रमाई घरकुल योजना मागील बऱ्याच काळापासून सुरू केली आहे. त्यानिमित्त शासन या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन बेघराला विनामुल्य घर उपलब्ध करवून दिले जात आहे. परंतु शासनाच्या नियम व कायद्यांची पायमल्ली करुन ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त समिती अध्यक्षाने गावातील काही निरक्षरांच्या अज्ञानतेचा फायदा घेतला. य महाभागांनी काही व्यक्तींना घरकुल मंजुर करवून देण्याचे खोटे आमिष देऊन प्रत्येकी दोन हजार रुपये बेकायदेशीर घेऊन फसवणूक केली.
याबाबतची तक्रार संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करिता देण्यात आली होती. मात्र अद्याप कारवाई करण्यात आली नसल्यामुळे शासनाप्रती या नागरिकात रोष निर्मण झाला आहे. तक्रार करुन बरेच दिवस लोटूनही त्या ग्राम पंचायत सदस्य व तंटामुक्त समिती अध्यक्षावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मागावा तर कोठून अशा प्रश्न लूबाडणूक झालेल्या व्यक्तींकडून करण्यात येत आहे.
पीडित तक्रारकर्त्यांनी घडलेल्या पूर्ण गैरकृत्याची रितसर लेखी तक्रार संबंधित कार्यपालन अधिकारी, खंडविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांना कारवाई करण्याकरिता दिली. मात्र बरेच दिवस होऊनही अद्याप कसलीच कारवाई अजूनपर्यंत झाली नाही. त्यामुळे तक्रारीची जिरवाजिरव झाल्याचा आरोप आता तक्रारकर्ते करीत आहेत.(वार्ताहर)