खोट्या तक्रारींची चौकशी करा
By Admin | Updated: July 9, 2016 02:02 IST2016-07-09T02:02:15+5:302016-07-09T02:02:15+5:30
महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे प्रमुख आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावर भाजप नगरसेवकाने प्राणघातक हल्ला केला होता.

खोट्या तक्रारींची चौकशी करा
जिल्हा काँग्रेस कमिटी : जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
गोंदिया : महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे प्रमुख आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावर भाजप नगरसेवकाने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर जिल्हा बंदच्या दरम्यान या षडयंत्रकाऱ्यांनी आपला हल्ला योग्य दर्शविण्यासाठी अज्ञात लोकांच्या नावाने काही बोगस एफआयआर केले. प्राणघातक हल्ल्यात मुख्य आरोपी शिव शर्मा यास जमानत मिळाल्यानंतर पोलिसांवर दबाव घालून अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात खोट्या साक्षीच्या आधारावर अटक करण्याची भीती सांगून प्रताडित केले जात आहे. तसेच पुढेसुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांना खोट्या प्रकरणांत फसविण्याची पूर्ण तयारी दिसून येत आहे. या सर्व बाबींना घेवून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांची भेट घेवून निवेदन दिले.
निवेदनानुसार, ज्या हल्लेखोरांनी वृद्ध व वरिष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला केला ते बाहेर आहेत व निर्दोष काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, हे अनुचित आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांवर या बोगस कारवाईला पुढे करत आ. अग्रवाल यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची चौकशी शिथिल करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. जर फिर्यादींवरच दबावतंत्राच्या माध्यमातून अशाप्रकारे पोलिसांची कारवाई होईल तर येणाऱ्या काळात जिल्हा तथा राज्यात पोलीस प्रशासनाचा दबाव गुन्हेगारांवर राहणार नाही व अराजकता कायम होईल. त्यामुळे असामाजिक तत्वांची हिंमत आणखीनच वाढेल.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेहमी शांतिप्रिय ढंगातून आपली गोष्ट पुढे मांडण्याचे कार्य केले. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते कधीही गुन्हेगारी कार्यवाहीत संलग्न झाले नाही, ही बाब जिल्ह्यातील जनतेला चांगल्यापणे माहीत आहे. आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपी कारागृहाच्या बाहेर व उलट काँग्रेस कार्यकर्त्यांवरच पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, ही अत्यंत गंभीर व आश्चर्यजनक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना सात मुद्यांबाबत निवेदन दिले. तसेच काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर घटनेच्या जवळपास तीन महिन्यानंतर खोट्या साक्षीच्या आधारावर प्रताडित करणे व निर्दोष कार्यकर्त्यांवर अकारण होणारी कार्यवाही थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी केलेल्या मागण्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने ऐकून घेतल्या व म्हणाले, जिल्ह्यात कायद्याची व्यवस्था बणवून ठेवण्यास त्यांचे प्रथम प्राधान्य आहे. तसेच कोणत्याही स्तरावर बोगस तक्रारींवर कार्यवाही करून बोगस तक्रारींना वाढ देणे पोलिसांची भूमिका नाही. आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला निश्चितच निंदनीय घटना आहे. अशा गंभीर प्रकरणात लिप्त गुन्हेगार व षडयंत्रकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची नजर आहे. पोलीस प्रशासन व न्याय पालिकेच्या माध्यमातून अशा गुंडागर्दी करणाऱ्या तत्वांवर निश्चितपणे कारवाई होईल. त्यामुळे गुन्हेगारी तत्वांवर नियंत्रण लागेल.
असे सांगून प्रतिनिधी मंडळास संपूर्ण विश्वास देत भुजबळ म्हणाले की, कायद्याच्या व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सर्वोपरी आहे. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारे पूर्वग्रह किंवा राजकीय दबाव तंत्रांतर्गत खोटी कार्यवाही होणार नाही, असे ते म्हणाले.
प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश रहमतकर, पं.स. सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प. काँग्रेस पक्षनेते रमेश अंबुले, जि.प. सदस्य विजय लोणारे, दीपक नशीने, सुनील भालेराव, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक अरूण दुबे, सावलराम महारवाडे, पं.स. सदस्य चमन बिसेन, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जहीर अहमद, नगरसेवक व्यंकट पाथरू, शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अपूर्व अग्रवाल, सुनील तिवारी, देवा रूसे, अमरचंद अग्रवाल, मनिष मेश्राम, ललिंद्र शेंडे, राजेश असाटी, दिलीपसिंह बैस, महेश माधवानी, देवेंद्र अग्रवाल, मेहबूब अली, अशोक मेहरा, लिखिराम पगरवार, सुशील अग्रवाल, डॉ. हरिणखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)