अस्वलाच्या हल्ल्यात जखमीची वन विभागाकडून थट्टा
By Admin | Updated: October 15, 2015 02:04 IST2015-10-15T02:04:36+5:302015-10-15T02:04:36+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील कास्तकार संतोष तेजराम वरकडे (४५) हे आपल्या शेतात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून...

अस्वलाच्या हल्ल्यात जखमीची वन विभागाकडून थट्टा
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील कास्तकार संतोष तेजराम वरकडे (४५) हे आपल्या शेतात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून जबर जखमी केले होते. नुकसान भरपाई म्हणून वन विभागाने १ हजार २७० रुपयाचा चेक देऊन त्यांची थट्टाच केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सविस्तर असे की, ६ आॅगस्ट २०१४ रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान सदर कास्तकार नित्याप्रमाणे धानाच्या बांध्यात पाणी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी गेला असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून जबर जखमी केले होते. चेहऱ्याला नखाने गोटून डोळ्या खालचा मांस काढून टाकला होता. शेतकऱ्याच्या कुत्र्याने जोरजोराने भूकुंन अस्वलाला पळून जाण्यास भाग पाडले. त्याच शेतशिवारातील इतर कास्तकार धावून गेले असता संतोष वरखडे जखमी अवस्थेत पडले होते.
आरडाओरड झाल्याने इतरही लोक जमा झाले व जखमी संतोषला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. जखमीवर प्रथमोपचार करून त्वरित केटीएस रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविले. त्यांची अवस्था बघून तेथून लगेच वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे दोन आठवडे उपचार चालला. परिस्थिती हलाखीची असल्याने गावातील लोकांनी मदत केली तर काही रक्कम कर्जाच्या स्वरुपात घेऊन औषधोपचार केला.
हिंस्त्र पशूने हल्ला केल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. चेहरा विद्रुप झाल्याने डॉ.के.के. रामटेके यांच्याकडून सर्जरी करून घेतली, त्याचा खर्च १९ हजार ७०० रुपये आला होता. नुकसान भरपाई मिळाल्यावर इतरांकडून घेतलेली रक्कम परत करणार होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चकरा मारतामारता जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला. त्यानंतर त्यांना वन विभाग कार्यालय गोंदिया यांच्याकडून फक्त १ हजार २७० रुपयांचा चेक देण्यात आला. चेकची रक्कम बघून पीडित कास्तकाराला धक्काच बसला.
हिंस्त्र पशूपासून मृत्यू पावले त्यांना अथवा गंभीर जखमींना शासन लाखोचा निधी देतो. मग एवढ्या गंभीर जखमीला १ हजार २७० रूपयांचा चेक कोणत्या आधारे देण्यात आला, हे न उलगडणारे कोडे आहे.
वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित व्यक्तीला त्वरित नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी पीडित व्यक्तीने केली आहे. (वार्ताहर)