संवादपर्वातून योजनांची माहिती
By Admin | Updated: September 10, 2016 00:17 IST2016-09-10T00:17:55+5:302016-09-10T00:17:55+5:30
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नसते.

संवादपर्वातून योजनांची माहिती
तहसीलदार सांगडे : योजनांचा लाभ घेऊन जीवन सुखकर करा
गोंदिया : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नसते. योजनांची माहिती संबंधित अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी लाभार्थ्यांना प्रभावीपणे द्यावी. लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेवून आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन सालेकसा तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय मंदिरातील गणेश मंडळात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाच्या विविध योजना, ध्येय-धोरणे व निर्णयांची माहिती देण्यासाठी संवादपर्व या जनप्रबोधनात्मक कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून बाई गंगाबाई शासकीय स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, बाल विकास प्रकल्प (नागरी) अधिकारी बी.डी. पारखे, महिला व बाल कल्याण विभागाचे परिविक्षाधिन अधिकारी आर.एन. बोधले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अर्धनारेश्वरालय ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदराम वरकडे, सचिव बाजीराव तरोणे, प्रा.डॉ. नामदेव हटवार, आमगाव (खुर्द) ग्रा.पं. सदस्य ब्रजभूषण बैस यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांगडे पुढे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन करण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. या उत्सवाच्या माध्यमातून युवाशक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येत आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून एकतेचा संदेश देण्यात येत आहे. याच माध्यमातून शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांना व नागरिकांना माहिती व्हाव्यात, यासाठी संवादपर्व उपयुक्त असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी माहितीचा अधिकार, सेवा हमी कायदा, आपले सरकार, महा स्कीम यासह अन्य योजनांची माहिती दिली.
जिल्ह्यातील शेतकरी कडधान्य पिकाकडे वळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ५० टक्के अनुदानावर कडधान्य बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.डॉ.हटवार यांनी सांगितले की, बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांच्या विरोधात भारतीयांना जागृत करण्यासाठी तसेच त्यांचे प्रबोधन करण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करु न त्यांनी काही योजनांची समिक्षा होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
बैस यांनी जिल्ह्याच्या विकासात विविध यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्वाचे योगदान आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांसोबतच नागरिकांची भूमिका महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी संवादपर्व या जनप्रबोधनात्मक उपक्र माचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यात करण्यात येत असल्याचे सांगितले.
तसेच शासनाच्या लोकोपयोगी योजना, ध्येय-धोरणे, अभियान व निर्णयाची माहिती संवादपर्वच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचिवण्यात येत आहे. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार अभियान यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
प्रांरभी मान्यवरांच्या हस्ते गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले. संचालन बाजीराव तरोणे यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. यावेळी हलबीटोला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अर्धनारेश्वरालय ट्रस्टच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
- मुलींचा जन्मदर वाढावा
शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मुलीचा जन्मदर वाढला पाहिजे. ज्या गावांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांच्या जन्मदराच्या तुलनेत जास्त आहे त्या गावांचा सन्मान व बक्षीस शासन देणार आहे. मुलींचा जन्म नाकारला जात असल्यामुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना उपयुक्त असल्याचे बाल विकास प्रकल्प (नागरी) अधिकारी बी.डी. पारखे यांनी सांगितले.
महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला व बालकांच्या कल्याणासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. बाल संगोपन ही योजना निराधार बालकांच्या संगोपनासाठी उपयुक्त आहे. मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक योजना राबविण्यात येते. मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून पीडित महिला व मुलींना आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येते, असे मार्गदर्शन महिला व बाल कल्याण विभागाचे परिविक्षाधिन अधिकारी आर.एन. बोधले यांनी केले.
मनुष्य आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून स्त्रीभ्रुण हत्या करीत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. मुलामुलींच्या जन्मदराच्या संख्येत संतुलन साधले पाहिजे. मुलगा ज्याप्रमाणे वंशाचा दिवा आहे त्याचप्रमाणे मुलगीसुध्दा पणती आहे. ती दोन्ही घरांचा सांभाळ करते. मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. मुली कुपोषित होवू नये यासाठी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे. या वेळी त्यांनी जननी शिशु सुरक्षा योजना, जीवनदायी आरोग्य योजना, १०८ क्र मांक व १०४ क्र मांक यासह अन्य आरोग्यविषयक योजनांची माहिती डॉ. हुबेकर यांनी दिली.