पोलीस कोठडीत दिली स्फोटकांची माहिती
By Admin | Updated: April 21, 2017 01:25 IST2017-04-21T01:25:56+5:302017-04-21T01:25:56+5:30
छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे घातपात करून जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात दडून बसण्यासाठी आलेल्या जखमी

पोलीस कोठडीत दिली स्फोटकांची माहिती
‘त्या’ नक्षलवाद्याला २४ पर्यंत पोलीस कोठडी : उपचार घेताना नक्षलवाद्याला अटक
गोंदिया : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे घातपात करून जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात दडून बसण्यासाठी आलेल्या जखमी नक्षलवाद्याला गोंदिया पोलिसांनी १२ एप्रिल रोजी अटक केली. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीत पोलिसांनी त्याच्याकडून वदविलेल्या माहितीमुळे चांदसुरज येथील पहाडीवर घातपात करण्यासाठी स्फोटके पेरून ठेवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे १० मार्च रोजी घातपात घडवून पोलिसांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला नक्षलवादी गंभीर जखमी झाला. त्याने आश्रय घेण्यासाठी सालेकसा तालुक्याचा मुरकुडोह गाठले.
१२ एप्रिल रोजी मुरकुडोह येथे संशयास्पद इसम उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी स्थळ गाठून त्याची चौकशी केली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो नक्षलवादी असल्याचे लक्षात आले.
रमेश कोसा टेकाम उर्फ बोमन कोसा मडावी (१९) रा. सुरनार ता.नकुलनार जि. दंतेवाडा (छत्तीसगड) असे त्याचे नाव समोर आले. तो अनेक घटनात समाविष्ट असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्याला पहिल्यांदा १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गोंदिया पोलिसांनी चांदसुरज येथील पहाडीवर पेरून ठेवलेली स्फोटके जप्त करण्यात आले.
त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दंतेवाडा, राजनांदगाव व गडचिरोली येथे पोलिसांचे पथक पाठविण्यात आले. आणखी कुठे-कुठे भुसुरूंग करून स्फोटक पेरण्यात आले याची माहिती घेण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)