महागाईच्या चटक्याने फळे झाली कडू
By Admin | Updated: April 22, 2017 02:36 IST2017-04-22T02:36:06+5:302017-04-22T02:36:06+5:30
उन्हाळ्यात ताजेतवाने राहून सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी फळांचा आहारात वापर केला जातो.

महागाईच्या चटक्याने फळे झाली कडू
सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर : पौष्टिक आहार झाला दुरापास्त
गोंदिया : उन्हाळ्यात ताजेतवाने राहून सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी फळांचा आहारात वापर केला जातो. पौष्टिक आहाराची खाण असलेली फळे आज मात्र महागाईच्या चटक्याने भाजल्या गेली आहेत. फळांचे दर ऐकताच घाम येणार आज अशी स्थिती असून महागाईच्या चटक्याने फळे कडू झाली आहेत. त्यामुळे शरीराला लागणारा पौष्टिक आहारच आता हिरावला गेला आहे.
आज प्रत्येकच पदार्थांत रसायनांचा वापर व भेसळ होत असल्याने खाद्यान्यांतील पौष्टीकता व सकसपणा लोप पावला आहे. त्यामुळे जेवणालाही पूर्वी सारखा रूचकरपणा उरलेला नाही. अशात दररोजच्या जेवणासह शरीराला आवश्यक असलेल्या जीवनसत्वांसाठी फलाहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फळांतून शरिराला आवश्यक ते जीवनसत्व मिळतात. मात्र आजची महागाई जेथे दोन वेळचे जेवण हिरावून घेत आहे तेथे फळांची तमा काय अशी स्थिती बघावयास मिळत आहे.
कधी कांदा, कधी डाळ तर कधी टमाटर डोळे वटारते. अशात कोणकोणत्या वस्तूंचा त्याग करायचा हा प्रश्न पडतो. मात्र पोटाची आग शमविण्यासाठी खिशात हात घालावाच लागतो. पौष्टीक जीवनसत्वांची खाण असलेल्या फळांनाही या महागाईने आपल्या पाशातून सोडले नसल्याचे दिसत आहे. त्याचे कारण असे की, आज बाजारात मिळणाऱ्या फळांचे दर एवढे चढले आहेत की, दर ऐकताच हातपाय गळतात. अशात एखाद्या स्वस्थ माणसाला तर सोडाच मात्र आजारी माणसालाही फळं खायला देणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. म्हणूनच महागाईच्या चटक्याने फळं कडू झाले म्हणणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी)
फळे होणार गायब
एरवी बाजारात दिसणारी काही फळे उन्हाळ्यात मात्र दिसत नाहीत. उन्हाळ््यात हिरव्या भाज्या ज्याप्रमाणे बाजारात येत नाहीत, त्याचप्रकारे काही फळेही बाजारातून गायब होतात. यात संत्री, अंगूर व डाळींबांचा समावेश आहे. उन्हाळ््यात या फळांचे उत्पादन होत नसल्याने ही फळे आता बाजारात येणार नसल्याचे फळ विक्रेते सांगत आहेत.
फळांच्या राजाची धूम
उन्हाळा म्हटला म्हणजे फळांच्या राजाचा हंगाम. त्यामुळे सध्या बाजारात आंब्याची चांगलीच धूम आहे. फळविक्रेत्यांकडे सध्या बैगनफल्ली, तोतापूरी व हापूस आंबा बघावयास मिळत आहे. यात बैगनफल्ली ६० रूपये किलो, तोतापूरी ४० किलो तर हापूस आंबा मात्र ६०० रूपये डझनच्या दराने विक्री केला जात आहे. वर्षातून एकदाच फळांचा राजा बाजारात येत असल्याने नागरिकांकडून त्याचा मनसोक्त आनंद लुटला जात आहे.