महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:36+5:302021-09-09T04:35:36+5:30

कपिल केकत गोंदिया : मागील वर्षभरापासून सातत्याने सुरू असलेल्या महागाईचा भडका आताही काही थांबलेला नाही. पेट्रोल-डिझेलपासून सुरू झालेली ही ...

Inflation poured oil; Home budget went bad! | महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !

महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !

कपिल केकत

गोंदिया : मागील वर्षभरापासून सातत्याने सुरू असलेल्या महागाईचा भडका आताही काही थांबलेला नाही. पेट्रोल-डिझेलपासून सुरू झालेली ही महागाई आता सर्वच वस्तूंना होरपळून टाकत आहे. यामुळे मात्र सर्वसामान्यांना खाणे-पिणे त्यातच वाहन चालविणेही कठीण झाले आहे. किराणा असो की, भाजीपाला स्वस्त म्हणून आज काहीच उरलेले नाही. अशात चैनीच्या वस्तू तर सोडाच, मात्र जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करणेही कठीण होत आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सर्वसामान्यांना आता दिवस काढणेही कठीण होत आहे.

--------------------------------------

१) तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च

वस्तू वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)

खाद्य तेल - ९५०

शेंगदाणे- १६०

साखर- २३४

साबुदाणा- १४०

चहापूड- ५००

तूरडाळ- २००

गॅस सिलिंडर ९५५

पेट्रोल- ४०००

एकूण- ७१३९

---------------------------

ताटातून वरण गायब

जेवणाचे ताट म्हटले म्हणजे त्यात वरण, भात, भाजी व पोळी असा क्रम गणला जातो. विशेष म्हणजे, हा सर्व पदार्थ नसल्यास जेवण अधुरे वाटते. मात्र आजघडीला वाढलेल्या महागाईमुळे जेवणाच्या ताटातील वरण हा पहिला पदार्थच आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाला आहे. तुरीची डाळ १०० रूपयांवर असल्याने ताटातून वरण हळूहळू गायब होत आहे.

-----------------------

३) अशी वाढली महागाई

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रतिकिलो रूपयांत)

शेंगदाणा तेल - १७०- १९०

सोयाबीन तेल - १४०- १६०

शेंगदाणे- १५०-१६०

साखर- ३३- ३९

साबुदाणा- ६०-७०

मसाले- ८००- १०००

चहापूड-४००-५००

तूरडाळ- ९०- १००

मूगडाळ- ११०- १२०

उडीद डाळ- ११०- १२०

हरभरा डाळ- ६५- ७५

-----------------------------------

सिलिंडर हजाराच्या घरात

आजघडीला जेथे सर्वच पदार्थांचे दर वाढले असून किराणा खरेदी करताना भल्याभल्यांना घाम फुटत आहे. अशात आता स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलिंडरही ९५५ रुपयांवर पोहोचला आहे. अशात महिन्याला आता हजार रूपयांचा सिलिंडर खरेदी करावा लागणार असे दिसताच काय खावे व काय शिजवावे असा प्रश्न गृहिणींना पडत आहे.

-------------------------

गृहिणी म्हणतात...

अगोदर माझा किराणा ३५०० ते ५००० रूपयांत होत होता. मात्र आता महागाईमुळे १०००० हजारावर फक्त किराणा जात आहे. त्यानंतर हजार रूपयांचा सिलिंडर झाला असून पेट्रोल- वीजबिल व अन्य खर्च लागून आहेच. एवढ्यानंतर काही नवीन करायचे म्हणजे प्रश्नच पडत असून हे सर्व आता असह्य होत आहे. महागाईवर नियंत्रण गरजेचे आहे.

- सीमा बढे

-------------------------

आजघडीला सर्वच वस्तूंचे दर वाढले आहे. सिलिंडर आता हजार रूपयांच्या घरात गेला असून किराणा खरेदी करता करताच बजेट बिघडून जातो. अन्य दैनंदिन खर्चसुद्धा डोकेदुखी वाढवीत आहेत. अशात सर्वसामान्यांनी काय खावे हाच प्रश्न पडतो. शासनाने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांची सोय करावी.

- मीनल बैस

Web Title: Inflation poured oil; Home budget went bad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.