इंदिरा आवासच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला
By Admin | Updated: August 6, 2015 00:46 IST2015-08-06T00:46:42+5:302015-08-06T00:46:42+5:30
१५-२० वर्षापूर्वी शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता घरकुल तयार करण्यात आले होते.

इंदिरा आवासच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला
भूकंपानंतर खिळखिळा : बांधकामातील दोष उघड
काचेवानी : १५-२० वर्षापूर्वी शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता घरकुल तयार करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामाचे उदाहरण असलेल्या या घरकुलांतर्गत तालुक्यातील ग्राम खुरखुडी येथील दीनदयाल तुलाराम कोसरे यांच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला. त्यामुळे या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या अन्य घरकुलांची तपासणी करण्याची, तसेच कोसरे यांना नवे घरकूल देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी केली आहे.
गेल्या २३ जुलैला झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने तिरोडा तालुक्याच्या खुरखुडी येथील दिनदयाल तुलाराम कोसरे यांच्या घराच्या छताला भेग पडून तो वाकला होता. हा वाकलेली स्लॅब चार दिवसांपूर्वी रात्री ८.३० वाजताच्यादरम्यान कोसळला. सुदैवाने कोणतीही जनहानी झाली नाही. भूकंपाच्या धक्क्याने स्लॅब ७० टक्के वाकल्यानंतर त्या ठिकाणावरून वावरणे बंद करण्यात आले होते, त्यामुळे कोणतीही जीवित हाणी झाली नाही, असे परिवाराने सांगितले.
भूकंपाच्या दुसऱ्या दिवशी (दि.२४) ला महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले. मात्र त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही किंवा दखल घेतली नाही, असे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भूकंपाच्या धक्क्याने वाकलेला स्लॅब कोसळल्याने मनोज डोंगरे, पं.स. सदस्य मनोहर राऊत, सरपंच प्रमिला बोपचे, पोलीस पाटील भारती रामटेके, उपसरपंच गणेश रहांगडाले, ग्रामसेवक एस.एन. तळेगावकर, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष छबीलाल पटले आणि अन्य ग्रा.पं. सदस्याच्या प्रमुख उपस्थितीत घटनास्थळी जावून कोसळलेल्या छताचा पंचनामा करण्यात आला. लगेच याची सूचना उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, तहसीलदार चव्हाण यांना देण्यात आली. त्यांनी पंचनामा करण्याकरिता मंडळ अधिकारी दाते यांना पाठवून अहवाल सादर केला. (वार्ताहर)
जिल्ह्यातील ९० टक्के घरकुलांची दुर्दशा
१५ ते २० वर्षापूर्वी इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्रयात जीवन जगणाऱ्या आणि घर नसणाऱ्यांकरिता घरकुल तयार करून देण्यात आले होते. या घरकुलांचे बांधकाम बघता त्या घरकुलाचे आयुष्य १० वर्षाच्या वर नसल्याचे दिसून येते. त्यात आजघडीला या घरकुलांची दशा अधिकच दयनीय झाली आहे.
ज्यावेळी ही घरकुले बांधली त्या काळी निधी फारच कमी असल्याने कंत्राटदारांनी कसेतरी बांधकाम केले. परिणामी बांधकाम मजबूत झाले नाही. संपूर्ण जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी इंदिरा आवासचे घरकूल अशाच पद्धतीने तकलादू असल्याचे सांगितले जात आहे.
इंदिरा आवासमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची आजची स्थिती पाहिली तर डुकरांच्या झोपड्यामध्ये राहण्यासारखी तिथे राहणाऱ्यांची स्थिती आहे. भूकंपासारखी घटना किंवा संततधार पावसात एखादे घरकूल कोसळले तर जीवहानी होऊ शकते.