इंडिगो एअरलाईन्सला झटका

By Admin | Updated: February 9, 2016 01:33 IST2016-02-09T01:33:45+5:302016-02-09T01:33:45+5:30

गोवा टूर अरेंज्ड करणाऱ्या ११ लोकांनी टूरचे पैसे भरल्यावर इंडिगो एअरलाईन्सने तिकीट रद्द केली.

Indigo airlines shock | इंडिगो एअरलाईन्सला झटका

इंडिगो एअरलाईन्सला झटका

ग्राहक न्यायमंचचा निर्णय : ६१ हजार नऊ टक्के व्याजाने देण्याचे आदेश
गोंदिया : गोवा टूर अरेंज्ड करणाऱ्या ११ लोकांनी टूरचे पैसे भरल्यावर इंडिगो एअरलाईन्सने तिकीट रद्द केली. मात्र टूरपोटी भरलेले ६१ हजार रूपये परत न करणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलाच झटका दिला. न्यायमंचाने नऊ टक्के व्याजाने ६१ हजार ६०० रूपये, त्रासापोटी १५ हजार रूपये तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रूपये तक्रारकर्त्याला द्यावे, असा आदेश पारित केला.
निखिल आनंदराव भांडारकर रा. रामनगर (गोंदिया) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तर विरूद्ध पक्षामध्ये विक्रांत देशमुख (बिझनेस मॅनेजर, इंडिगो एअर लाईन्स, नागपूर), इंडिगो एअर लाईन्स, जनरल मॅनेजर (इंडिगोर एअरलाईन्स, गुरगाव, हरियाणा) व रमनितसिंग चावला रा. रामनगर, बाजार चौक, गोंदिया यांचा समावेश आहे.
निखिल भांडारकर व त्यांच्या मित्रांनी गोवा येथे जाण्यासाठी टूर अरेंज्ड केला होता. त्यासाठी विरूद्ध पक्षाला ६१ हजार रूपये देवून विमानाचे तिकीट घेण्यात आले. नेट बँकींग प्रक्रियेने आयसीआयसीआय बँकेचे खाते क्रमांक, इंटर ग्लोबल एव्हिएशन लि. नावावर रक्कम जमा करण्यात आली.
त्यानंतर सदर विमानाचे तिकीट रद्द झाल्याचे तक्रारकर्ते भांडारकर यांना कळले. त्यामुळे त्यांनी पुन्हा १३ सप्टेंबर २०१४ ला गोवा जाण्यासाठी टूर अरेंज्ड केला. या वेळी टूरवरून परतल्यावर त्यांनी मागे रद्द झालेल्या तिकिटांची रक्कम ६१ हजार रूपयांची सदर कंपनीकडून मागणी केली. मात्र त्यांना रक्कम परत करण्यात आली नाही. यासाठी इंडिगो एअर लाईन्सचे बिझनेस मॅनेजर देशमुख संपूर्ण जबाबदार आहेत. मात्र त्यांनी आपली जबाबदारी झटकत विरूद्ध पक्षातील जनरल मॅनेजर व रमनितसिंग चावला यांना रक्कम पाठविल्याचे सांगितले. तर चावला यांनी कुणाकडूनही रक्कम प्राप्त न झाल्याचे सांगितले.
या टोलवाटोलवीमुळे भांडारकर यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली व ८६ हजार ६०० रूपये तसेच १० हजार रूपयांच्या व्याजासाठी दावा केला. शिवाय व्यवहार झाल्याचे सर्व दस्तऐवज प्रकरणात दाखल केले. न्यायमंचाकडून इंडिगो एअरलाईन्सला नोटिस पाठविण्यात आले. मात्र त्यांच्याकडून कुणीही उपस्थित झाले नाही व त्यांनी आपले उत्तरही दाखल केले नाही. त्यामुळे न्यायमंचाने एकतर्फी आदेश पारित केला.
तक्रारकर्ते भांडारकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व सर्व दस्तऐवजांची तपासणी करीत कारणमिमांसा केली व त्यांची तक्रार अंशत: मान्य केली. विरूद्ध पक्षाने भांडारकर यांना ६१ हजार ६०० रूपये परत करावे. तसेच प्रकरण दाखल झाल्याच्या तारखेपासून सदर रकमेवर नऊ टक्के व्याज, शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल १५ हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रूपये मंजूर करण्यात आला. तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी ३० दिवसांच्या आत करण्यात यावी असा आदेश दिला.
सदर आदेश न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वामन व्ही. चौधरी यांनी पारित केला. (प्रतिनिधी)

Web Title: Indigo airlines shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.