दत्तक ग्राम योजनेत सदस्यांचीच उदासीनता
By Admin | Updated: November 30, 2014 23:06 IST2014-11-30T23:06:07+5:302014-11-30T23:06:07+5:30
सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव

दत्तक ग्राम योजनेत सदस्यांचीच उदासीनता
गोंदिया : सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव पंचायत विभागाकडे द्यावयाचे होते. मात्र ५२ पैकी आतापर्यंत केवळ २० सदस्यांनी गावांचे नाव देऊन स्वच्छता अभियानाबद्दलच्या उदासीनतेचा परिचय दिला आहे. जे सदस्य स्वत:च उदासीन आहेत ते गावाला स्वच्छतेची सवय कशी लावणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वच्छ भारत मिशन हे अभियान शहरांपुरतेच मर्यादीत न राहता यात लहानातील लहान गाव सहभागी होऊन प्रत्येक स्तरापर्यंत स्वच्छतेचा संदेश जावा हा उद्देश आहे. यातूनच या अभियानांतर्गत प्रत्येक खासदारांना एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचे निर्देश देण्यात आले. याच धर्तीवर जिल्हा परिषदेने देवरी येथे स्वच्छता अभियान राबविले व त्यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा असे ठरले. यासाठी २६ नोव्हेंबर पर्यंत सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील निवडण्यात आलेले गाव जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे कळविणे गरजेचे होते.
मात्र कित्येक जिल्हा परिषद सदस्यांनी अद्याप गावांची नावे कळविलीच नसल्याची माहिती आहे. तर काही सदस्य सहलीसाठी बाहेरगावी निघून गेल्याचे ऐकीवात आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत जिल्ह परिषद अध्यक्षांनाही माहिती नसून विभागाकडे फक्त त्यांनी निवडलेल्या गावाची माहिती आहे.
गावातील लोकप्रतिनिधी, संस्था व शाळांची मदत घेऊन त्या गावात अभियान राबवायचे आहे. मात्र येथे जिल्हाम परिषद सदस्य स्वत:च उदासिन असताना अभियानाचा फज्जा उडविला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. विशेष म्हणजे या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्राम पंचायत सरपंच, सचिव, सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्यांचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्याचे ठरले आहे.
मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या उदासिनतेमुळे या अभियानावरच प्रश्न लागले आहे. तर या गंभीर प्रकरणाला घेऊन पंचायत विभागातील एक कर्मचारी २८ नोव्हेंबर रोजी पत्र घेऊन जिल्हा परिषद सदस्यांकडे गेल्याचीही माहिती हाती लागली. अशात आता कसे तरी हे अभियान एकदाचे उरकून घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)