शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे

By Admin | Updated: February 25, 2017 00:22 IST2017-02-25T00:22:10+5:302017-02-25T00:22:10+5:30

आपल्याकडे जलयुक्त शिवार अंतर्गत मामा तलाव आहेत. त्याचप्रमाणे आयुक्तप्रणित सिंचन विहिरींचा कार्यक्रमसुद्धा राबविला जात आहे.

Increase the yield of farmers to double | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे

अनुप कुमार : जिल्हा परिषदेत विविध विभागांचा घेतला आढावा
गोंदिया : आपल्याकडे जलयुक्त शिवार अंतर्गत मामा तलाव आहेत. त्याचप्रमाणे आयुक्तप्रणित सिंचन विहिरींचा कार्यक्रमसुद्धा राबविला जात आहे. या सर्व योजनांची सांगड घालून कृषी सधनता वाढविण्यावर भर देण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी कार्य करा, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. शेजारच्या मध्यप्रदेश राज्याने सिंचन विहिरींची निर्मिती करुन कृषीक्रांती घडविल्याचेसुद्धा त्यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले.
जिल्हा परिषद सभागृहात बुधवार (दि.२२) जिल्हा परिषद विभागप्रमुख, गटविकास अधिकारी व लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी मत व्यक्त करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यावेळी उपस्थित होते.
मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, जलयुक्त शिवार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आदी विविध योजनांचा त्यांनी याप्रसंगी आढावा घेतला.
ते पुढे म्हणाले, गोंदिया हा मजुरांचा जिल्हा आहे. मनरेगामध्ये गोंदिया जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. या योजनेवर अडीचशे ते तीनशे कोटींचा खर्च होतो. त्यामुळे विकासात्मक कामावर भर असायला हवा. प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. थोडे प्रयत्न केल्यास राज्यात आपण पहिल्या क्रमांकावर येवू शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न करा. स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेताना ते म्हणाले, शौचालय हे साध्य नाही, ते साधन आहे. लोकांना उघड्यावर बसण्यापासून परावृत्त करणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने मार्चअखेरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले.
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांचे सक्षमीकरणावर भर देत चंद्रपूर येथे २ मार्चपासून आयोजित ‘स्वयंसिद्धा’ या कार्यक्रमात बचत गटांना पाठविण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. सिंचन विहीर, मामा तलाव व जलसिंचनाचा त्यांनी याप्रसंगी आढावा घेतला. सिंचन विहीर हा मध्यम वित्तीय शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे. ही योजना शेतकऱ्यांना आपली वाटली पाहिजे. तलावांचे पूर्नरुजीवन करताना त्याचा लाभ शेतकऱ्यांना अधिक होईल, यादृष्टीने कार्य करा. रबीच्या पिकांसह फळबागायती व भाजीपाल्यांची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. वन्यप्राण्यांचा त्रास असलेल्या भागात हळदीचे उत्पादन घेतल्यास त्यांचा चांगला फायदा होतो, असेही ते याप्रसंगी म्हणाले.
शाळा, अंगणवाडीमधील आधार नोंदणी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत डिजिटल शाळांचा आढवासुद्धा त्यांनी घेतला. गोंदिया जिल्ह्यात वाचन व गणितीय कौशल्य वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी २५ शिक्षकांची निवड करण्यात आलेली असून गोंदिया जिल्ह्यात वाचन कट्टे सुद्धा सुरू करण्यात आले असल्याबाबद त्यांनी गौरोद्गार काढले. दरम्यान शासनाच्या सर्वच योजनांमध्ये प्रगती साधण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांचे तथा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. जि.प.चे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एम. अंबादे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. पठाडे, उपमुख्य कार्यकारी अ धिकारी (नरेगा) नरेश भांडारकर, प्रभारी प्रकल्प संचालक विजय जवंजाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अनंता मडावी, इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख व सर्व पं.स.चे गटविकास अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

बालमृत्यू, मातामृत्यू दर शून्य करणार
गोंदिया जिल्हा समृद्ध जिल्हा आहे. येथील लोकांचे राहणीमानसुद्धा चांगले आहे. त्यातच येत्या काही दिवसांत जिल्हा डासमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यादृष्टीने तिरोडा तालुक्यातील दहा गावे प्राथमिक स्तरावर डासमुक्त करण्यासाठी निवडण्यात आले. त्याचप्रमाणे देशात बालमृत्यू व मातामृत्यू शून्य राहील यासाठी देखील कार्य करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा बैठकीत सांगितले.

 

Web Title: Increase the yield of farmers to double

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.