जिल्ह्यात इंटरनेटची साक्षरता वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 01:09 IST2016-06-18T01:09:41+5:302016-06-18T01:09:41+5:30
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर कसा करावा याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात इंटरनेटची साक्षरता वाढवा
विजय सूर्यवंशी : इंटरनेट साथी प्रशिक्षणात मार्गदर्शन
गोंदिया : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर कसा करावा याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. आता गुगल सर्च केले की, हवामानाचा अंदाज, जन्माचा दाखला, शेतीविषयक सात-बारा उतारा आदींची माहिती एका क्लिकवर इंटरनेटद्वारे उपलब्ध होते. त्यामुळे जास्तीत जास्त इंटरनेट साथी बघिनींनी इंटरनेटचे प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील इंटरनेटची साक्षरता वाढवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
येथे टाटा ट्रस्ट, गुगल इंडिया व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डिजीटल साक्षरता कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.१७) ‘इंटरनेट साथी प्रशिक्षण’ घेण्यात आले. यावेळी माविम मुंबईचे उपव्यवस्थापक महेश कोकरे, दिल्ली येथील टाटा ट्रस्टचे इंटरनेट प्रशिक्षक नवीनकुमार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यातील ४२२ गावांमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. महिलांनी इंटरनेट साथी उपक्र मांतर्गत इंटरनेटचे प्रशिक्षण घेऊन आपण आपल्या गावामध्ये इंटरनेटच्या वापराबाबत योग्य ती माहिती देऊन जनजागृती करावी. त्यामुळे जिल्ह्यातील इंटरनेटची साक्षरता वाढण्यास निश्चितच मदत होणार असेही त्यांनी सांगितले. कोकरे म्हणाले, आजकाल नोकरीसाठी वा कोणत्याही क्षेत्रात आॅनलाईन अर्ज भरण्याची पध्दत आहे. त्यामुळे महिलांनी सक्षम होण्यासाठी इंटरनेटचा वापर केला पाहिजे. जगाबरोबर वावरायचे असेल तर इंटरनेटचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नवीनकुमार यांनी इंटरनेटच्या वापराबाबत सविस्तर माहिती विषद केली.
प्रास्ताविकेत माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे म्हणाले, टाटा ट्रस्ट, गुगल इंडिया व माहिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने इंटरनेट साथी या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे ग्रामीण क्षेत्रात महिलांसाठी इंटरनेट संदर्भात जाणीव जागृती निर्माण करणे तसेच डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेच्या योजना, मार्केट दर, शेतीविषयक पध्दती आदी बाबतची माहिती होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात ३६ इंटरनेट साथीच्या माध्यमातून १६५ गावांमध्ये बचत गटातील महिलांना माहिती देण्याचा उपक्र म सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते उपस्थित इंटरनेट साथी भगिनींना अॅन्ड्राईड मोबाईल आणि टॅब वितरित करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन इंटरनेट साथी प्रशिक्षण कार्यक्र माचे उदघाटन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्र मास महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व इंटरनेट साथी भगीणी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
संचालन योगिता राऊत यांनी तर आभार सतीश मार्कंड यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)