गतवर्षीपेक्षा एसटीच्या दिवाळी उत्पन्नात वाढ
By Admin | Updated: November 2, 2014 22:37 IST2014-11-02T22:37:48+5:302014-11-02T22:37:48+5:30
राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीनिमित्त प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून काही विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. दिवाळीच्या कालावधीत गोंदिया आगाराच्या बसेस कमी धावल्या. तर

गतवर्षीपेक्षा एसटीच्या दिवाळी उत्पन्नात वाढ
देवानंद शहारे - गोंदिया
राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीनिमित्त प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून काही विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. दिवाळीच्या कालावधीत गोंदिया आगाराच्या बसेस कमी धावल्या. तर तिरोडा आगाराच्या बसेसचा भारमान कमी होता. असे असतानाही या दोन्ही आगारांचे दिवाळी काळातील उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याची माहिती आहे.
मागील वर्षभरापूर्वी झालेल्या उत्पन्नावर नजर टाकली तर यावर्षी गोंदिया आगाराला १२ लाख ७९ हजार १५२ रूपये अधिक उत्पन्न झाले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते. अनेक प्रवाशी आपला प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने करतात. दिवाळीच्या पाच दिवसांपूर्वी व पाच दिवसांनंतर बसेसमध्ये गर्दी दिसून येते. मागील वर्षी २६ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०१३ दरम्यान गोंदिया आगारातून झालेल्या तिकिटांच्या विक्रीतून ९२ लाख १२ हजार ७०९ रूपये मिळाले होते. तर सन २०१४ मध्ये १६ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबरपर्यंत एक कोटी चार लाख ९१ हजार ८६१ रूपयांचे उत्पन्न झाले. त्यामुळे गोंदिया आगाराला मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १२ लाख ७९ हजार १५२ रूपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले. तसेच दिवाळीच्या नंतरचे १० दिवसही आता पूर्ण झालेले नाहीत. शिवाय मागील वर्षाच्या तुलनेत बसांनी यंदा कमी प्रवास केला. मागील वर्षी २६ आॅक्टोबरपासून १० दिवसांपर्यंत ४० लाख ४० हजार ८४६ किमीचा प्रवास गोंदिया आगाराच्या बसांनी केला. तर यावर्षी १६ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत तीन लाख ५९ हजार १९७ किमीचा प्रवास केला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गोंदिया आगाराच्या बसेस ८१ हजार ६४९ किमी कमी धावल्या.
तसेच तिरोडा आगारातील बसेसमध्ये गर्दीचे भारमान गतवर्षीपेक्षा यंदा कमी असतानाही मागील दिवाळीपेक्षा या दिवाळीत अधिकचे उत्पन्न मिळाले. हे भारमान मागील वर्षापेक्षा ३.२१ टक्क्यांनी कमी होते.
यंदाची दिवाळी २३ आॅक्टोबर रोजी होती. तर मागील वर्षी दिवाळी ३ नोव्हेंबरची होती. यंदाच्या दिवाळीमध्ये तिरोडा आगाराच्या बसेसने २१ ते ३१ आॅक्टोबर २०१४ च्या कालावधीत ३९ लाख ६७ हजार २१६ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले. तर याच कालावधीत मागील वर्षी म्हणजे २१ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत २४ लाख ६६ हजार २८४ रूपयांचे उत्पन्न तिरोडा आगाराला मिळाले होते. तर मागील वर्षीच्या दिवाळीच्या १० दिवसात म्हणजे १ ते १० नोव्हेंबर २०१३ च्या कालावधीत २९ लाख ६२ हजार २४९ रूपये उत्पन्न मिळाले होते.
म्हणजे तिरोडा आगाराला गतवर्षीपेक्षा दिवाळी सणात यंदा उत्पन्न तब्बल १० लाख चार हजार ९६७ रूपये अधिक झाले.
सन २०१३ च्या दिवाळीच्या नोव्हेंबर महिन्यात तिरोडा आगाराच्या बसेस एकूण तीन लाख ७४ हजार २९० किमी धावल्या व त्यातून एकूण ९२ लाख ७१ हजार १६५ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले. तर यंदा सन २०१४ च्या दिवाळीच्या आॅक्टोबर महिन्यात तिरोडा आगाराच्या बसेस तीन लाख ९२ हजार ६४८ किमी धावल्या. त्यातून तिरोडा आगाराला एकूण ९७ लाख ७० हजार ०११ रूपयांचे उत्पन्न मिळाले. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या महिन्यात तिरोडा आगाराने तब्बल चार लाख ९८ हजार ८४६ रूपयांची अधिकची कमाई केली.