बसस्थानकावर गैरसोयी
By Admin | Updated: August 30, 2015 01:41 IST2015-08-30T01:41:37+5:302015-08-30T01:41:37+5:30
सहा महिन्यापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्थानिक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात झाला. मात्र अद्यापही येथे अनेक गैरसोयी आहेत.

बसस्थानकावर गैरसोयी
जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही : मंत्र्यांच्या हस्ते झाला होता स्थानकाचा शुभारंभ
अर्जुनी मोरगाव : सहा महिन्यापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्थानिक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात झाला. मात्र अद्यापही येथे अनेक गैरसोयी आहेत. बससेवेच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयाशी या तालुक्याची नाळ जुळलेली नाही. अख्ख्या राज्यात असा एकमेव तालुका असावा अशी शंका प्रवासी व्यक्त करीत आहेत.
स्थानिक बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा १७ जानेवारी रोजी संपन्न झाला. सर्व सुविधायुक्त बसस्थानक राहील अशी मुक्ताफळे उधळण्यात आली. मात्र येथे अनेक गैरसोयी आहेत. बसस्थानकावर सुलभ शौचालय नाही. चौकशी नियंत्रण कक्षात दुरध्वनी नाही. एकाच कर्मचाऱ्याच्या भरवशावर नियंत्रण कक्षाचा कारभार सुरू आहे. उपहार गृह अद्यापही सुरू करण्यात आले नाही. आदिवासी व दुर्गम भागातील अनेक मोठ्या गावांसाठी थेट बससेवा उपलब्ध नाहीत. अशा नानाविध समस्या आहेत. बस आगाराची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधी व राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका वैविधतेने नटलेला आहे. या तालुक्यात राष्ट्रीय उद्यान आहे. इटियाडोह धरण आहे. शिवाय महाराष्ट्रात वास्तव्यास असलेली एकमेव तिबेटीयन वसाहत आहे. हा तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून वाहतुकीचे साधन म्हणून रेल्वे व बससुविधा आहे.
रेल्वेने या तालुक्याची नाळ जुडलेली असली तरी बससेवेच्या बाबतीत हा तालुका संपर्क कक्षेच्या बाहेर आहे. या तालुक्यातील अनेक कर्मचारी दैनंदिन जिल्हा मुख्यालयात ये-जा करतात. मात्र सकाळच्या सत्रात रेल्वे व बससुविधा उपलब्ध नसल्यामुळे वळसा घालून साकोलीमार्गे १०० पेक्षा अधिक किलोमिटरचा प्रवास करवा लागतो. काही काळापूरती बससेवा उपलब्ध केली जाते मात्र अल्पावधीतच बंद केली जाते.
कोहमारा ते अर्जुनी मोरगाव अशी दिवसभर फेरी घालणारी शटल बससेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांना सोईचे होऊ शकते. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्याचा काही भाग येतो. या जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले सडक अर्जुनी तालुक्यातील आहेत. मात्र या ठिकाणी बससेवेचा थेट संपर्क नाही. या तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजोली (भरनोली) येथे केवळ दोन बसफेऱ्या आहेत.
तर झाशीनगर व केशोरी येथे थेट बससेवा नाही. सकाळची महागाव-नागपूर बस बंद करण्यात आली. नागपूरसाठी केवळ प्रतापगड व लाखांदूर मार्गे एक फेरी आहे.
बसस्थानकाला आठ महिन्याचा कालावधी झाला मात्र येथील समस्य अजूनही कायम आहेत. मंत्री नेहमीप्रमाणे भाषण देऊन मोकळे झाले मात्र जनतेला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.(तालुका प्रतिनिधी)
राजकारण्यांचे काय?
१७ जानेवारी रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव-यवतमाळ बससेवा सुरू करुन हिरवी झेंडी दाखविली. या कार्यक्रमात हजारो लोक उपस्थित होती. ही बस सेवाच महामंडळाने बंद केली. यापूर्वी या भागाचे आ. नाना पटोले हे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शिर्डी व पंढरपूर या लांब पल्ल्याच्या बससेवा अर्जुनी मोरगाव येथून सुरू केल्या होत्या. वर्षभराचे आतच या बससेवा बंद करण्यात आल्या. एकंदरित राजकारण्यांनी सुरू केलेल्या बससेवा क्षणिक असतात. अल्पवधीतच त्या बंद होतात हे कटूसत्य आहे. या पाठीमागे त्यांचा स्वार्थच असतो असा सूर सामान्य जनतेत उमटत आहे.