‘गंगाबाई’त गर्भवतींची गैरसोय

By Admin | Updated: March 31, 2015 01:27 IST2015-03-31T01:27:09+5:302015-03-31T01:27:09+5:30

जिल्ह्यातील एकमेव बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात हालत गंभीर झाली आहे. येथील प्रसूतीचे प्रमाण पाहून शासनाने

Inconvenience of pregnant women in 'Gangabai' | ‘गंगाबाई’त गर्भवतींची गैरसोय

‘गंगाबाई’त गर्भवतींची गैरसोय

प्रसूती तज्ज्ञांचा अभाव : वारंवार मागणी करूनही लक्ष दिले जात नाही

गोंदिया : जिल्ह्यातील एकमेव बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात हालत गंभीर झाली आहे. येथील प्रसूतीचे प्रमाण पाहून शासनाने सात प्रसुती तज्ज्ञांची पदे मंजूर केली असली तरी सध्या तीनच प्रसूती तज्ज्ञ कार्यरत असून त्यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. परिणामी अनेक गर्भवती महिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे या रुग्णालयात आलेल्या महिला नाईलाजापोटी खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत.
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात महिन्याकाठी २०० ते २५० च्या घरात प्रसूती केल्या जातात. महाराष्ट्रातून प्रसुती करण्यात गंगाबाई रुग्णालय दुसऱ्या क्रमांकाचे महिला जिल्हा रुग्णालय आहे. नागपूरच्या डागा हॉस्पिटलनंतर गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयाचा क्रमांक लागतो. परंतु या रुग्णालयात प्रसूती तज्ज्ञ उपलब्ध करण्यात शासन अपयशी ठरल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. प्रसूती तज्ज्ञांची सात पदे मंजूर असताना फक्त पाचच पदे भरण्यात आली आहे. त्यापैकी डॉ. गार्गी बाहेकर सहा महिन्यासाठी तर पुनम पारधी या एक महिन्यासाठी सुटीवर गेल्यामुळे डॉ. सायास केंद्रे, डॉ. योगेश सोनारे, डॉ. शीतल खंडेलवाल या तिघांना काम पहावे लागते. गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांची चढाओढ असल्याने या रुग्णालयात रुग्णांना ठेवावे कुठे हा प्रश्न येथील व्यवस्थापनासमोर पडतो.
या संदर्भात अनेकदा संबंधित डॉक्टरांनी प्रशासनाच्या बड्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली. परंतु गंगाबाईला आवश्यक असलेल्या डॉक्टरांची पूर्तता अद्याप झाली नाही. मोठ्या प्रमाणात रुग्णांचा कल गंगाबाई रुग्णालयाकडे असल्यामुळे येथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांचेही हाल झाले आहे. रात्रंदिवस प्रसूती करणारे डॉक्टरही कंटाळले आहेत. बाल मृत्यू व माता मृत्यू होऊ नये यासाठी त्या तीनपैकी कोणत्याही डॉक्टराला सुटी दिली जात नाही.
मागील वर्षभरापासून अशीच परिस्थिती गंगाबाई रुग्णालयात असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
रुग्णालयात आलेले रुग्ण सुरुवातीला बरे दिसल्यास डॉक्टर प्रसूतीसाठी गंभीर रुग्णांचा प्राधान्यक्रम लावतात ते योग्यही आहे. परंतु या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला माझ्या रुग्णाचा आधी नंबर लागावा असे वाटत असल्याने ते डॉक्टरांना वारंवार प्रसूती कधी होईल हे विचारणा करतात.
परंतु डॉक्टर निश्चित वेळ त्यांना सांगत नसल्यामुळे कंटाळलेले अनेक रुग्ण खासगी रुग्णालयाकडे धाव घेतात. गंगाबाई रुग्णालयात गर्भवती स्त्रियांकडे दुर्लक्ष होत असून त्यांची गैरसोय होत आहे. सोबतच येथील प्रसूती तज्ज्ञही कामाच्या व्यापामुळे त्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

वर्ग ३-४ ची अनेक पदे रिक्त
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात डॉक्टरच्या कमतरतेबरोबर वर्ग ४ व ३ च्या कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. वर्ग ३ चे ६० पदे (अधिपरिचारिका) मंजूर असताना फक्त २८ अधिपरिचारिका या रुग्णालयात कार्यरत आहेत. वर्ग ४ ची ५३ पदे मंजूर असताना फक्त १८ पदे भरली आहे. उर्वरित सर्व पदे रिक्त असल्यामुळे येथील व्यवस्थापन सांभाळण्यात येथील अधिक्षकाला कमालीची कसरत करावी लागते. परिणामी अनेकदा लोकांच्या तिव्र असंतोषाचे बळी येथील डॉक्टरांना व्हावे लागते.
रुग्णांना झोपण्यासाठीही जागा उपलब्ध नाही
गंगाबाई स्त्री रुग्णालयात वाढत्या रुग्णांची संख्या पाहून नवीन इमारत तयार करण्यात आली. परंतु ही इमारत मेडीकल कॉलेजला देण्याचे ठरविण्यात आल्यामुळे येथील रुग्णांना ठेवावे कुठे हा प्रश्न येथील व्यवस्थापनासमोर पडतो. मेडीकल कॉलेजला सुरुवातही झाली नाही आणि त्या इमारतीचा वापर करण्यासाठी गंगाबाईला न दिल्यामुळे गंगाबाईतील रुग्णांची गैरसोय होत आहे.

येथील रिक्त पदांची समस्या शासनाकडे व जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मांडली. गंगाबाईतील रुग्णांना चांगला उपचार मिळावा असा आमचा माणस आहे. परंतु रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दोन-तीन डॉक्टरांच्या माध्यमातून पूर्ण काम करण्याचा आमचा मानस असतो. परंतु संख्या अधिक असल्यामुळे गंभीर रुग्णांना आधी प्राधान्य दिल्या जाते. शासनाने डॉक्टरांची संख्या वाढविल्यास समस्या सुटू शकते.
-डॉ. संजीव दोडके
अधीक्षक बाई गंगाबाई रुग्णालय, गोंदिया

Web Title: Inconvenience of pregnant women in 'Gangabai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.