सहा दिवसांत ४४.७५ लाखाचे उत्पन्न
By Admin | Updated: November 14, 2015 01:56 IST2015-11-14T01:56:30+5:302015-11-14T01:56:30+5:30
दिवाळीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या असतात. विद्यार्थ्यांनाही सुट्या असतात. यात अनेक जण सहकुटुंब पर्यटनाला इतरत्र किंवा नातलगांच्या गावी जाण्याचा बेत आखतात.

सहा दिवसांत ४४.७५ लाखाचे उत्पन्न
गोंदिया आगार : दिवाळीसाठी १२ अतिरिक्त फेऱ्या सुरू
गोंदिया : दिवाळीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या असतात. विद्यार्थ्यांनाही सुट्या असतात. यात अनेक जण सहकुटुंब पर्यटनाला इतरत्र किंवा नातलगांच्या गावी जाण्याचा बेत आखतात. मात्र त्यांचा हा बेत एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवास केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे दिवाळीसाठी एसटीनेही नियोजन केले असून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एसटी महामंडळाच्या गोंदिया आगाराने यंदा दिवाळीसाठी अतिरिक्त वाढीव १२ फेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार यंदा केवळ सहा दिवसांत गोंदिया आगाराला ४४ लाख ७५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. दिवाळी असताना व वाढीव फेऱ्या असतानाही एसटीचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असल्यामुळेच एसटी महामंडळाच्या गोंदिया आगाराला केवळ सहा दिवसातच ४५ लाखांच्या जवळपास मजल मारता आली.
या उत्पन्नामध्ये केवळ ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंच्या उत्पन्नाचा समावेश आहे. गोंदिया आगाराला ७ नोव्हेंबर रोजी सात लाख ३४ हजार रूपये, ८ नोव्हेंबरला सात लाख ६५ हजार रूपये, ९ नोव्हेंबरला नऊ लाख १२ हजार रूपये, १० नोव्हेंबर रोजी आठ लाख ८३ हजार रूपये, ११ नोव्हेंबरला सात लाख ७३ हजार रूपये व १२ नोव्हेंबर रोजी चार लाख ८ हजार रूपये असा एकूण ४४ लाख ७५ हजार रूपयांचे उत्पन्न झाले.
यंदा दिवाळीनिमित्त गोंदिया-नागपूरसाठी पाच फेऱ्या वाढविण्यात आल्या. यात जाणाऱ्या तीन फेऱ्या देवरी मार्गे व येणाऱ्या दोन फेऱ्या साकोली मार्गे, असे नियोजन करण्यात आले होते.
याशिवाय गोंदिया-भंडारा बसेस तिरोडा व तुमसर मार्गे सुरू करण्यात आल्या. तर गोंदियावरून पूलगाव व आर्वी या लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या होत्या.