प्रोत्साहन अनुदानातून शेतकऱ्यांना मदत
By Admin | Updated: May 17, 2015 01:48 IST2015-05-17T01:48:02+5:302015-05-17T01:48:02+5:30
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतले जाते.

प्रोत्साहन अनुदानातून शेतकऱ्यांना मदत
अर्जुनी-मोरगाव : गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतले जाते. या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २५० रुपये धानाला वाढीव प्रोत्साहन अनुदान शासनाने जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल. मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांनी भाजीपाला व इतर पीकांकडे वळले पाहिजे असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियांतर्गत शनिवारी (दि.१६) आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवनसरंक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, माजी आमदार दयाराम कापगते, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, पंचायत समिती सभापती तानेश ताराम, बाजार समिती सभापती काशीमजमा कुरैशी, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, कार्यकारी अभियंता वाकोडीकर, अपंग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, प्रकल्प अधिकारी सरोदे, ख.वि.समितीचे अध्यक्ष नामदेव कापगते, जि.प. सदस्य उमाकांत ढेंगे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी गुरे चराईसाठी शासनाने जागा मुकर्रर करुन द्यावी, अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा व केशोरीला ग्रामीण रुग्णालय मंजूर करावा, शेतकऱ्यांना सातबाराच्या आधारावर सानुग्रह अनुदान द्यावे, तलाव विकासासाठी निधी द्यावा तसेच मग्रारोहयो मधील विहिरींसाठी ६०.४० ची अट रद्द करावी या मागण्या प्रकाश गहाणे व तानेश ताराम यांनी मांडल्या.
यावेळी तीन चाकी सायकलचे वाटप, ग्रामपंचायतींना सामूहिक वनहक्क पट्टे वाटप, वैयक्तिक वनहक्क पट्टे वाटप, संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना गॅस अनुदानाचे धनादेश वाटप, इतर मागासवर्गीयांना व्यावसायीक कर्जाचे धनादेश वाटप, वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीबद्दलचे भरपाई धनादेश, शाहू, फुले, आंबेडकर दलीत वस्ती पुरस्कार योजनेत ग्रामपंचायत महालगावला पाच लाखाचे प्रथम, हिरडामाली ग्रा.पं.ला तीन लाखाची द्वितीय तर पदमपूर ग्रा.पं. ला दोन लाखांची तृतीय पुरस्कारांची राशी धनादेशद्वारे वितरीत करण्यात आली. आंतरजातीय विवाह अनुदान, अपंग वित्त व विकास महामंडळाकडून व्यावसायीक कर्जवाटप, कृषी विभागातर्फे प्रगतशिल शेतकऱ्यांचा सत्कार, जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले विशाल शालीकराम मेश्राम यांचा सत्कार जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या दोन आशा स्वयंसेविकांचा सत्कार, कृषी विभागातर्फे स्प्रे पंप वाटप, तसेच सर्पदंश व धानाचे पुंजणे जळालेल्या बाधित व्यक्तिंना सानुग्रह मदतराशीचे वितरण पालकमंत्री बडाले व जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आली.
प्रास्ताविक तहसीलदार संतोष महाले यांनी मांडले. संचालन प्रा.शरद मेश्राम यांनी केले. खंडविकास अधिकारी जी.डी. कोरडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)
जनतेची घोर निराशा
या शिबिरात विविध शासकीय योजनेंर्गत लाभार्थ्यांना धनादेश व पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. समस्यांचे निराकरण होईल या अपेक्षेने उपस्थित झालेल्या जनताजनार्दनाची मात्र घोर निराशा झाली. अभियानांतर्गत आलेल्या निधीची वासलात लावण्याचाच हा प्रकार असल्याच्या चर्चा सभामंडपात चर्चिल्या जात होत्या. या शिबिरात खासदार नाना पटोले व खासदार प्रफुल पटेल यांची कार्यक्रमाला दांडी हा सुद्धा चर्चेचा विषय होता. विशेष उल्लेखनिय म्हणजे, गोंदिया जिल्ह्यातील हे पहिले समाधान शिबिर होते.