धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले, मग आता खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST2021-06-01T04:22:29+5:302021-06-01T04:22:29+5:30
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून खरेदीला सुरुवात झाल्याचे भासविले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही धान ...

धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले, मग आता खरेदी करा
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून खरेदीला सुरुवात झाल्याचे भासविले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही धान खरेदीला सुरुवात झाली नाही. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे केंद्राचे उद्घाटन केले, मग आता प्रत्यक्षात धान खरेदीला सुरुवात करून शेतकऱ्यांची कोंडी सोडवा, अशी मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, रब्बीतील धान खरेदीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. जिल्ह्यात केवळ धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात धान खरेदीला अद्यापही सुरुवात झाली नाही, तर मागील खरीप हंगामात विक्री केलेल्या धानाचे बोनस अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची अद्यापही मिलिंग सुरू झालेली नाही. त्यामुळे हा धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीजण केवळ धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केल्याचे दाखवून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रब्बीतील धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले होते. मात्र, नोंदणी केल्यानंतर देखील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे पहिल्यांदाच रब्बीतील धान खरेदी खरीप हंगामाला सुरुवात होऊन देखील सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट असून, खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही नेते केवळ वृत्तपत्रात स्वत:चे छायाचित्र छापून घेऊन श्रेय लाटत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणीकडे त्यांचे कुठलेच लक्ष नसल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे. याच विषयाला घेऊन माजी आ. अग्रवाल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच रब्बी धान खरेदीला त्वरित सुरुवात करण्याची मागणी केली.
............
भाजप छेडणार आंदोलन
रब्बी हंगामातील धान खरेदीला अद्यापही प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. धानाचे बोनस मिळाले नाही. रब्बी धान विक्रीसाठी नोंदणी करूनसुद्धा धान खरेदी केली जात नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्हा प्रशासनाने रब्बीतील धान खरेदीला त्वरित सुरुवात न केल्यास भाजपच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिला आहे.