भूलथापांना बळी न पडता चूक सुधारा
By Admin | Updated: June 27, 2015 02:23 IST2015-06-27T02:23:24+5:302015-06-27T02:23:24+5:30
निवडणुकीच्या प्रसंगी मोठी आश्वासने द्यावी, स्वप्न दाखवावे आणि सत्तेत आल्यानंतर त्या सर्व गोष्टी विसरणे, ...

भूलथापांना बळी न पडता चूक सुधारा
प्रफुल्ल पटेल : सत्तारूढ सरकारवर हल्लाबोल
गोंदिया : निवडणुकीच्या प्रसंगी मोठी आश्वासने द्यावी, स्वप्न दाखवावे आणि सत्तेत आल्यानंतर त्या सर्व गोष्टी विसरणे, भाजपाला चांगलेच जमले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २०० व ५० रुपयावरही भाजपाने डल्ला मारला. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसुद्धा देण्यात आली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिशाभूल करुन सत्ता काबीज करुन घेतली. आता तरी भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदार करून यापूर्वीची चूक सुधारा, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचार दौऱ्यात गोरेगाव व सडक अर्जुनी तालुक्यात आयोजित सभांना ते संबोधित करीत होते. ओबीसी विद्यार्थी आज अडचणीत आला आहे. सहा लाखापर्यंतची क्रिमीलियर मर्यादा भाजपा सरकारने चार लाखापर्यंत केली. असे असले तरी निवडणुकीपुरते मर्यादा वाढ करण्याच्या बोंबा मारत आहेत. शेतकऱ्यांच्या धानाच्या भावात वाढ व्हायला पाहिजे होती ती उलट कमी केली. अनुदान जाहीर केले, पण देणार केव्हा? याचा अर्थ हे सरकार शेतकऱ्यांचे नाहीच. ही बाब सांगण्यासारखी असून आपसूक समजण्यासारखी आहे, हे देखील उघडपणे दिसून येते. म्हणून लोकसभेत केलेली चूक आता पुन्हा करू नका. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता द्या, आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)