‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना राबवा
By Admin | Updated: August 22, 2016 00:20 IST2016-08-22T00:20:05+5:302016-08-22T00:20:05+5:30
गावांना शांततेकडून समृध्दीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.

‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना राबवा
पालकमंत्री बडोले : जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठक
गोंदिया : गावांना शांततेकडून समृध्दीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. तंटामुक्त गाव समित्यांनी यासाठी निश्चित कौतुकास्पद काम केले आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी तंटामुक्त समित्यांना प्रशिक्षण देऊन एक गाव एक गणपती बरोबर विविध उपक्रम राबवावे असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठकीत ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, सदस्य सचिव तथा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महीरे, उपविभागीय पोलीस अधिकारी देविदास इलमकर, दिपाली खन्ना, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी जिल्हा व्यसनमुक्ती अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राधेशाम शर्मा यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या गाव पातळीवरील समित्यांचे गठण शासन निर्णयानुसार करण्यात यावे. समितीच्या माध्यमातून एक गाव एक गणपती स्थापन करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करावे. हया समित्या गठण करतांना योग्य व्यक्तीची निवड करावी. समितीचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी पोलीस पाटील, समितीचे सचिव, पोलीस कर्मचारी-अधिकारी यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात यावे, प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत दारुबंदी झालेल्या गावांची, गुन्हे घडणाऱ््या गावांची यादी तयार करावीे, ज्या गावामधून समित्याच्या माध्यमातून चांगले काम झाले असेल त्या गावातील संबंधितांची दखल घेवून त्यांचा सन्मान करण्यात यावा असेही त्यांनी सांगितले. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, एक गाव एक गणपती ही अत्यंत चांगली संकल्पना असून गावाला एकजूट करण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. तंटामुक्त समित्या हया सक्र ीयपणे कशाप्रकारे काम करतील याचे नियोजन करावे. डॉ.भूजबळ म्हणाले, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या कामात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. भविष्यात जिल्ह्यात गाव पातळीवर तंटे होवूच नये यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. गाव पातळीवर सुरक्षा दल तयार करण्यात येतील. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे आले पाहिजे. गावाची सुरक्षा गावकऱ्यांच्या हाती देण्याचा आपला प्रयत्न असून याबाबत नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २५६ गावे तंटामुक्त झाले आहेत. यामध्ये नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातील ११४ गावांचा समावेश आहे. ६२ ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. या ५५६ गावांना १४ कोटी ७ लक्ष २५ हजार रुपयाचे पुरस्कार देण्यात आला आहे. २०१५-१६ यावर्षात जुलै अखेर दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर दाखल ६ हजार ३२० तंट्यांपैकी ४३९१ तंटे निकाली काढण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी दिली. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)