तिरोडा तालुक्यात अवैध रेती वाहतूक
By Admin | Updated: November 18, 2014 22:58 IST2014-11-18T22:58:15+5:302014-11-18T22:58:15+5:30
तिरोडा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला मोठ्या प्रमाणात ऊत आली आहे. या अवैध वाहतुकीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमेटी क्रीडा सेलचे अध्यक्ष प्रा. विलास

तिरोडा तालुक्यात अवैध रेती वाहतूक
सुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला मोठ्या प्रमाणात ऊत आली आहे. या अवैध वाहतुकीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमेटी क्रीडा सेलचे अध्यक्ष प्रा. विलास दुर्योधन मेश्राम यांनी केला आहे.
तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारे शासकीय कामे व प्रत्येक व्यक्तीला गरज असणारी सुव्यवस्थित घरे यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची आवश्यकता भासते. आधुनिक युगात प्रत्येक बांधकामात सिमेंट-काँक्रिट तयार करण्यासाठी रेतीचा वापर होते. रेतीची निंतात आवश्यकता असल्यामुळे व मागूनही न मिळाल्याने सरतेशेवटी चोरी करणे भाग पडते. त्यातूनच अवैध शब्दाची उत्पत्ती होवून अवैध कामे करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले जातात.
तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, अजूनपर्यंत रेती घाटांना शासनाकडून मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लिलाव करण्यात आलेला नाही. यालाच मुख्य अडचण म्हणजेच रेती घाट असणाऱ्या गावांकडून प्राप्त न झालेले ग्रा.पं.चे ठराव. ग्रा.पं. ठराव न देण्याचे कारण म्हणजे त्या गावात उद्भवणारी समस्या आहे.
गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकीमुळे मोठेमोठे खड्डे पडलेले आहे. वाहतुकीमुळे गावात धुळीचे साम्राज्य पसरते. या प्रकाराने वातावरण दूषित होवून गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आजार होण्याची शक्यता असते.
ज्या गावातून ठराव मागितला जातो, त्या गावाची होणारी दुर्दशा प्रथम सोडविण्याचे काम प्रशासनाने करायला हवे. त्या गावाची होणारी अडचण भागवली तर रेती घाट लिलावास होणारी अडचण निर्माण होणार नाही. तसेच अवैध रेती वाहतूकही करावी लागणार नाही.
सदर प्रकाराकडे संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आवश्यक बाब समजून लक्ष घालावे. त्वरीत त्या गावातील अडचणींचे निवारण करावे. असे झाल्यास या भागातील रेतीघाटांवरून होणाऱ्या रेतीच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्याचा प्रसंगच निर्माण होणार नाही, असा विश्वास गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटी क्रीडा विभागाचे अध्यक्ष प्रा. विलास मेश्राम यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)