कृषी साहित्याची अवैध विक्री
By Admin | Updated: November 27, 2015 02:09 IST2015-11-27T02:09:30+5:302015-11-27T02:09:30+5:30
शासनाच्या वतीने तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालय सुरू केले आहे. मात्र कृषी विभागाकडून ज्या पध्दतीने शेतकऱ्यांना बी-बियाणे,

कृषी साहित्याची अवैध विक्री
तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : कृषी अवजारे, बी-बियाणे, औषधीची अधिक दरात विक्री
आमगाव : शासनाच्या वतीने तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालय सुरू केले आहे. मात्र कृषी विभागाकडून ज्या पध्दतीने शेतकऱ्यांना बी-बियाणे, कृषी अवजारे, औषधी व अन्य साहित्य यांची योग्य पध्दतीने नियोजन करण्यात आले नाही. कृषोपयोगी साहित्याची अवैध विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी आपल्या घरी शासनाकडून शेतकऱ्यांकरिता आलेले सामान-साहित्य घेवून जातात. तसेच हे साहित्य जास्त किंमतीने विकण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याकडे तालुका कृषी अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यात काही मिलीभगत तर नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना शासनाकडून शेतीपयोगी अनेक साहित्य, औषधी व बी-बियाणे कृषी विभागाला मिळतात. ते शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या दराने शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. मात्र तालुक्यात परिस्थिती उलटी आहे. कृषी विभागातील रिसामा येथील वास्तव्य करीत असलेला व आणखी नगरातील कर्मचारी आपल्या घरी शासनाकडून आलेले साहित्य, औषधी, बी-बियाणे ठेवतात. तसेच घरूनच इतरांना परस्पर विकतात. याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारे साहित्य किंवा इतर सामान कर्मचाऱ्यांच्या घरी कशाप्रकारे जातात? हा मोठा चिंतेचा विषय आहे. आपल्या घरी विकण्याचा शासन नियम नाही. मात्र हा वेळापत्रक अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ज्यांना गरज आहे, त्यांना मिळत नाही व इतरांना बोलावून त्यांच्या दुकानात जाऊन साहित्य बि-बियाणे, औषधी व इतर सामानाची विक्री मनमर्जीने करण्यात आली आहे. यात अनाप-शनाप पैसे घेण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा मार्गदर्शनासाठी कृषी विभागाकडून कसलेही सहकार्य मिळत नाही. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचे वास्तव्य भंडारा असल्याने ते मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे इतर कर्मचारी सुसाट सुटले आहेत. शेतकऱ्यांचा कुणी कार्यालयात वाली नाही. त्यांना कृषीविषयक मार्गदर्शन मिळणेही कठिण झाले आहे.
त्यामुळे येथील सुरू असलेला खेळखंडोबा त्वरित बंद करावे व योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)