निवड चुकल्यास पाच वर्षाकरिता पश्चाताप कराल
By Admin | Updated: October 29, 2015 00:12 IST2015-10-29T00:12:22+5:302015-10-29T00:12:22+5:30
ग्रामपंचायत वरून नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर तेथील नागरिकांची जबाबदारी जास्त वाढली आहे.

निवड चुकल्यास पाच वर्षाकरिता पश्चाताप कराल
विखे पाटलांचा इशारा : भाजप सरकारने केला भ्रमनिरास
गोंदिया : ग्रामपंचायत वरून नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर तेथील नागरिकांची जबाबदारी जास्त वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीत योग्य व्यक्तीला निवडून न दिल्यास पाच वर्षेपर्यंत पश्चाताप करण्याची वेळ येईल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
ते देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव येथील काँग्रेस उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आ.सुनील केदाम, आ.गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आ.रामरतन राऊत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ना.विखे पाटील म्हणाले, या निवडणुकीत योग्य व्यक्ती आणि योग्य पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याकडे नागरिकांनी लक्ष दिले पाहीजे. गेल्या दिड वर्षात भाजप सरकारने सामान्य नागरिकांना काय दिले आणि काय हिरावले याचा विचार नागरिकांनी केला पाहीजे. २०० रूपये किलोची डाळ, १०० रुपये किलोचे कांदे तरीही शेतकऱ्यांची दुरवस्था, बेरोजगारी, खोटी आश्वासने यापलिकडे काहीही त्यांनी दिले नाही. यासोबतच आपल्यात नकली काँग्रेस पार्टी उभी झाली. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होईल, असे सांगून काँग्रेसच्याच उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक निरीक्षक नियुक्त
जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून गडचिरोलीचे अपर जिल्हाधिकारी मंगेश आव्हाड हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३२८९८०० हा आहे. सडक-अर्जुनी नगर पंचायतीकरिता भंडारा येथील समाजकल्याणचे सहायक आयुक्त डी.एन.धारगावे निवडणूक निरीक्षक (८८०६१२३५०५), अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतीकरिता भंडारा येथील उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी.लोखंडे निवडणूक निरीक्षक (९९६००३८६८३), गोरेगाव नगर पंचायतीकरीता नागपूरचे वस्त्रोद्योग सहसंचालक (तांत्रिक) राजेश भुसारी (९८८१७५०५३५), देवरी नगर पंचायतीकरीता भंडाराचे शंकर किरवे हे निवडणूक निरीक्षक (९४०४८१०३५८) आहेत. निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी असल्यास निवडणूक निरीक्षकांशी संपर्क करता येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आज अनेक नेत्यांची गर्दी
नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचार करण्यासाठी भाजपतर्फे पालकमंत्री राजकुमार बडोले दि.२९ ला गोंदियात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी दोन दिवसात चारही नगर पंचायतीत प्रचारसभा घेतला. काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी सभा घेतल्या. गुरूवारी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सभा होणार आहेत.