क्रीडा संकुल ठरणार आदर्श
By Admin | Updated: November 8, 2015 01:42 IST2015-11-08T01:42:42+5:302015-11-08T01:42:42+5:30
गोंदियासारख्या मागास व दुर्गम भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेले क्रीडा संकुल तयार होत आहे.

क्रीडा संकुल ठरणार आदर्श
पालकमंत्र्यांची ग्वाही : वाढीव निधी देणार, काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश
गोंदिया : गोंदियासारख्या मागास व दुर्गम भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेले क्रीडा संकुल तयार होत आहे. हे क्रीडा संकुल राज्यात आदर्श मॉडेल नावारूपास येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन इमारतीत शनिवारी (दि.७) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ.गोपालदास अग्रवाल होते. यावेळी मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा क्रीड़ा अधिकारी अशोक गिरी, प्रा.जीवानी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, क्रीडा संकुलाच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. क्रीडा संकुलनाच्या पूर्णत्वासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून सुद्धा निधी मिळविण्याचा प्रयत्न असून येत्या सहा महिन्यात या क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले. भविष्यात विविध प्रकारच्या क्रीडापटूंसाठी हे क्रीडा संकुल उपयोगात येणार आहे.
क्रीडा संकुलासाठी आणखी साडेसहा कोटीची आवश्यकता असल्याचे आ.अग्रवाल म्हणाले. या कामाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. पालकमंत्र्यांच्या सहकार्याने हे क्रीडा संकुल पूर्ण होईल. क्रीडा संकुलासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी पालकमंत्र्यांनी फीत कापून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी निमगडे यांनी केले. कार्यक्रमाला क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची व क्रीडापटूंची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)
काम तातडीने पूर्ण करा
यावेळी पालकमंत्री बडोले यांनी क्रीडा संकुलाच्या इमारतीची तसेच जलतरण तलावाची पाहणी करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या संकुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या कामासाठी निधी कमी पडू नये म्हणून तत्कालीन अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी काही कंपन्यांचा सीएसआर निधी मिळवून दिला होता. मात्र तत्कालीन जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्यास उशिर झाल्यामुळे तो निधी पुरेपूर मिळू शकला नाही. अन्यथा हे क्रीडा संकुल आतापर्यंत पूर्णत्वास गेले असते.