चोरखमाऱ्यात श्वापदांची शिकार

By Admin | Updated: December 13, 2015 01:51 IST2015-12-13T01:51:08+5:302015-12-13T01:51:08+5:30

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कितीही कडक कायदा केला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी करणारे वनविभागाचे अधिकारीच उदासीन असल्याने जिल्ह्यात श्वापदांची शिकार होत आहे.

Hunting the animals in the tricolor | चोरखमाऱ्यात श्वापदांची शिकार

चोरखमाऱ्यात श्वापदांची शिकार

मृत प्राण्यांचे सांगाडे पडून : करंट लावून मारतात, वनाधिकारी दडपतात प्रकरणे
नरेश रहिले गोंदिया
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कितीही कडक कायदा केला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी करणारे वनविभागाचे अधिकारीच उदासीन असल्याने जिल्ह्यात श्वापदांची शिकार होत आहे. नागझिरा अभयारण्याच्या चोरखमारा येथे विद्युत करंट लावून वन्यजिवांची शिकार केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर कारवाई करण्यास वनविभागाचे अधिकारी धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी शासनाने मोठा खर्च करून नागझिरा अभयारण्यात मनुष्यबळ ठेवले. पण हे कर्मचारी व अधिकारी शिकारीला आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत. तिरोडा तालुक्याच्या चोरखमारा येथील नागझिरा अभयारण्य परिसरात मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची करंट लावून शिकार केली जात आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांचे व शिकाऱ्यांचे साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चा होत आहे.
वारंवार होत असलेल्या शिकारीची माहिती उपवनसंरक्षकांना व वन्यजीवप्रेमींना मिळाल्यानंतर गेल्या २२ नोव्हेंबरला शिकार करताना चोरखमारा येथील फागू कुंभरे नावाच्या व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने अशा शिकारीत गावातील नऊ लोक समाविष्ट असल्याची माहिती दिली. या घटनेला २० दिवसांचा कालावधी लोटला, मात्र ज्या शिकाऱ्यांची नावे वनाधिकाऱ्यांना सांगितली होती, त्यापैकी एकालाही अटक करण्यात आली नाही.
श्वापदं शेतपिकाची नासाडी करतात. त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विद्युत करंट लावल्याचे ते सांगत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. चोरखमारा येथे असलेल्या हॉटेलच्या मागील परिसरातच शिकार होत असल्याची माहिती आहे. अनेक प्रकरण येथेच दडपले जातात.
गावकऱ्यांचा एकोपा असल्याने प्रकरण बाहेर येत नाही. मागील महिनाभरापूर्वी मोठ्या प्रमाणात नीलगाईंचीही शिकार झाली आहे. करंट लागून मृत्यू पावलेल्या ठिकाणी प्राणी महिनाभर तसेच पडून होते. त्या प्राण्याच्या मृतदेहाचे पुरावेही वनाधिकाऱ्यांना मिळाले. परंतु कारवाईसाठी वनाधिकारी धजावत का नाही, हे न सुटणारे कोडे आहे.

आरोपींने सांगितली नावे
चोरखमारा येथे झालेल्या शिकारीत हरिचंद तुकाराम सोयाम, बालचंद गोमा पंधरे, राजेंद्र भाऊदास सोयाम, देवदास ग्यानिराम रामटेके, रमेश हरिचंद इनवाते, उमेश अनंतराम नैताम, शालीक सखाराम सोयाम, धनराज रामजी गणवीर, बाबूलाल जानू मेश्राम या नऊ जणांचा समावेश असल्याची माहिती फागू कुंभरे याने दिल्याची माहिती वडेगाव येथील क्षेत्रसहाय्यक एन.पी. वैद्य यांनी दिली.
‘ते’ गेट बंद करण्याचा प्रस्ताव
या चोरखमारा गेटमधून नागझिरा अभयारण्यात पर्यटक भ्रमंतीसाठी जातात. त्यामुळेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची शिकार होत आहे. या शिकारीवर आळा घालण्यासाठी चोरखमारा गेट बंद करण्याचा प्रस्ताव न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्याच्या वतीने शासनाकडे पाठविला आहे.

उपवनसंरक्षकांचा घेराव
चोरखमारा येथे वन्यप्राण्यांच्या शिकारीसंदर्भात आरोपी फागू कुंभरे याला २२ नोव्हेंबर रोजी चोरखमारा येथे अटक केली. त्यावेळी उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर व त्यांच्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी यांचा तेथील लोकांनी घेराव करून आरोपीला सोडण्यासाठी दबाव टाकला. परंतु त्यावेळी वनाधिकाऱ्यांनी अनुचित प्रकार घडू न देता फक्त एकाच आरोपीला अटक केली. त्याने नाव सांगितलेल्या नऊ जणांना अद्याप अटक झालेली नाही.

Web Title: Hunting the animals in the tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.