ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर उपासमारीची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST2021-06-27T04:19:31+5:302021-06-27T04:19:31+5:30
बोंडगावदेवी : गावातील सर्वसामान्य जनतेला राहण्यासाठी हक्काचा निवारा मिळावा यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून घरकुल तयार करून दिले जात आहे. ...

ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर उपासमारीची पाळी
बोंडगावदेवी : गावातील सर्वसामान्य जनतेला राहण्यासाठी हक्काचा निवारा मिळावा यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून घरकुल तयार करून दिले जात आहे. मात्र लाभार्थ्यांच्या घरकुलाचे निर्माणाधीन काम करणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंते मागील दीड वर्षापासून मिळणाऱ्या अल्पशा मानधनापासून वंचित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामावर देखरेख ठेवणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंते सर्वत्र कार्यरत आहेत. या अभियंत्याची नियुक्ती एनजीओ संस्थेमार्फत करण्यात आली आहे. त्यांना घरकुल बांधकामावर मेहनताना दिला जात असल्याचे सांगण्यात येते. सद्या स्थितीत अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमध्ये १० प्रमाणे जिल्ह्यात ८० ग्रामीण गृहनिर्माण अभियंते बाह्य खाजगी यंत्रणेकडून कार्यरत आहे. त्यांच्या तांत्रीक मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण केले जाते. घरकुलासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांस घरकुलाचे आवश्यक दस्तऐवजासह फाईल, लेआऊट, टप्याटप्यांनी काढण्यात येणारे बांधकामाचे देयके, बांधकाम सुरु असताना वेळोवेळी दिली जाणारी गृहभेट एकंदरीत घरकुल बांधकामाचे संपूर्ण नियंत्रण ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचे असते. एका घरकुलाचा मेहनताना पायवा बांधकाम, सज्जापर्यंत, पूर्ण छत, शौचालयासह घरकुलाचे पूर्ण बांधकाम झाल्यावर अशा ४ टप्यात मिळणे आवश्यक आहे. नोव्हेंबर २०१९ पासून ते आतापर्यंत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना मानधन मिळाले नसल्याची ओरड आहे. गावखेड्यातील लाभार्थ्यांचे टुमदार घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे, वेळोवेळी गृहभेट देऊन बांधकामाचे निरीक्षण करुन लाभार्थ्यांना बांधकाम सबंधी मार्गदर्शन करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना गृहभेटीचा प्रवास सुध्दा मिळत नसल्याची माहिती आहे. मागील दीड वर्षांपासून मानधन मिळाले नसल्याने सबंधित गृहनिर्माण अभियंत्यावर उपासमारीची पाळी आहे.