२० हजार बालकांना जेवण देणाऱ्या उपाशी
By Admin | Updated: March 12, 2017 00:23 IST2017-03-12T00:23:29+5:302017-03-12T00:23:29+5:30
तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत जिल्हा परिषदेच्या १३८ शाळा, खाजगी अनुदानीत ३७ असे १७५ शाळा आहेत.

२० हजार बालकांना जेवण देणाऱ्या उपाशी
अल्पसे मानधन : चार महिन्यांपासून मोबदलाच नाही
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत जिल्हा परिषदेच्या १३८ शाळा, खाजगी अनुदानीत ३७ असे १७५ शाळा आहेत. इयत्ता १ ली ते ८ वीच्या २० हजार २९७ विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्याचे काम ३४० स्वयंपाकी व मदतनीस एक हजाराच्या अल्प मानधनावर करीत आहेत. परंतु या महिलांना मागील ४ महिन्यापासून त्यांच्या कामाचा मोबदला न मिळाल्याने त्यांच्या कुटूंबावर उमासमारीची वेळ आली.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत मागील काही वर्षापासून शालेय पोषण आहार योजना शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांची गळती थांबावी, गावातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये, सामान्य विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेमध्ये शासनाच्या वतीने मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गावातील महिलांची स्वयंपाकी व मदतनिस म्हणून शाळा समिती मार्फत निवड केली जाते. निवड झालेल्या स्वयंपाकी व मदतनीस महिलांना एका महिन्यापोटी सरसकट एक हजार रुपये असे अल्पशे मानधन दिले जाते. देण्यात येणारा हा तुटपुंजा मोबदलाही दर महिन्याला त्यांच्या हातात मिळत नाही.
मोलमजूरी करणाऱ्या विधवा महिला आहार शिजविण्याच्या कामावर येतात. त्या महिला दिवसभर राबून दर महिन्याला हजाराची नोटाच्या मोबदल्यासाठी पंचायत समितीच्या पायऱ्याही झिजवतात. दिवसापोटी ३० रुपये ३३ पैसे रोजी घेऊन प्राथमिक शाळेतील मुलांना दुपारचे जेवण वाढणाऱ्या स्वयंपाकी व मदतनिस आज आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवतील याचेही आत्मचिंतन सरकारने करणे गरजेचे आहे. दर महिन्यापोटी मोबदला मिळत नाही अशी व्यथा स्वयंपाकीन महिलांनी मांडली. महिन्यापोटी एक हजार रुपयाचा मानधन काढण्याची तसदी संबधीत विभाग घेत नाही. गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या मोबदल्याचे पैसे अजून पावेतो मिळाले नाही. शाळेत मध्यान्ह भोजन शिजविण्याचे काम करताना इतर दुसरे काम करता येत नाही. हीच अल्पशी मजूरी त्या महिलांच्या कुटूंबाच्या चरितार्थाची शिदोरी आहे. चार-चार महिन्याचे मानधन थकीत असल्याने त्या सामान्य महिलांवर आज उपासमारीची पाळी आल्याचे चित्र आहे. पैशाअभावी येणाऱ्या सणावर पाणी फेरावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)