शेकडो किलो अन्न उकिरड्यावर

By Admin | Updated: January 5, 2015 23:06 IST2015-01-05T23:06:42+5:302015-01-05T23:06:42+5:30

लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमाणेच लहान गावांमध्येही मंगल कार्यक्रमांप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धती रुढ झाली आहे.

Hundreds of food festoon food | शेकडो किलो अन्न उकिरड्यावर

शेकडो किलो अन्न उकिरड्यावर

गोंदिया : लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमाणेच लहान गावांमध्येही मंगल कार्यक्रमांप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धती रुढ झाली आहे. या पद्धतीत अनेक जण भूक असो वा नसो, ताटात भरपूर अन्न घेतात व नंतर खायला जड झाले की ते ताटात तसेच सोडून देतात. शेकडो किलो अन्नाची नासाडी होत आहे.
वर्षभरात साधारणत: लग्नाचे ३० ते ३५ मुहूर्त असतात. एका मुहूर्ताला ४० हजार किलो म्हणजेच सात हजार लोकांचे अन्न अशा पद्धतीने चक्क उकीरड्यावर टाकले जाते. विशेष म्हणजे, जिल्ह्यात दररोज शेकडो लोक रोज अर्धपोटी झोपत असतानाही अशी नासाडी सुरू आहे. शहरात महागडे लग्न सोहळेही अर्थातच या नासाडीला हातभार लावत आहेत.
अन्नाची नासाडी रोखण्याच्या सुधांशू महाराज सत्संग समितीच्या प्रयत्नांना माहेश्वरी, अग्रवाल, जैन अशा विविध समाजांनी पाठिंबा दिला आहे. आपल्या समाजातील लग्न समारंभात भोजनाबाबत त्यांनी आचारसंहिताच लागू केली आहे. भोजनातील पदार्थांची संख्या कमी करण्याचा निर्णय या समाजांनी घेतला आहे. लग्न समारंभात होणाऱ्या अन्नाच्या नासाडीबद्दल जाणून घेण्यात आले.
यात शहरातील आठ-दहा मंगल कार्यालयांना भेट देऊन मंगल कार्यालयाचे मालक तसेच केटर्सशी संवाद साधला. एका लग्न समारंभात सरासरी ५०० लोक हजर असतात. बुफे पद्धतीमुळे रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. प्रत्यक्षात ताटातील अर्ध्यापेक्षा जास्त अन्न वाया जाते. उरलेल्या अन्नाने भरलेली ताटं टाकून दिली जातात. एका लग्न समारंभात किमान १००- १५० लोकांचे अन्न वाया जाते. उकिरड्यावर फेकून या अन्नाची विल्हेवाट लावली जाते. वेळेचा अभाव आणि अन्न गरिबांपर्यंत पोहोचिवण्यास साधनांची कमतरता यामुळे नाईलाजाने आम्हाला ते फेकून द्यावे लागते, असे दिसते. उकिरड्यावर फेकलेले अन्न सडून त्यातून मिथेन या घातक वायूची निर्मिती होते. ग्लोबल वॉर्मिंग तसेच वातावरणातील बदलास ही नासाडीही एकप्रकारे कारणीभूत आहे.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे, आपल्या देशातील ३५ कोटी लोकांना एक वेळचे जेवण मिळत नाही. तर अन्नाची सर्वाधिक नासाडीही आपल्याच देशात होते. ताटात टाकून दिलेले उष्टे अन्न गटारात व उकिरड्यावर टाकून दिल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. उष्टे न टाकता जेवण करणे हा अन्नपूर्णा देवीचा सन्मान होय असे बोलले जाते मात्र वास्तवीक त्यावर अमल कमीच जण करताना दिसतात. यामुळेच मोठ्या प्रमाणात अन्न देवतेचा अपमान केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of food festoon food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.