मानव विकासच्या बसेस फक्त मुलींसाठी चालवाव्या
By Admin | Updated: March 10, 2016 02:36 IST2016-03-10T02:36:24+5:302016-03-10T02:36:24+5:30
प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर तसेच भंडारा विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आगारांमध्ये मानव विकास कार्यक्रमाच्या ...

मानव विकासच्या बसेस फक्त मुलींसाठी चालवाव्या
देवरी : प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर तसेच भंडारा विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आगारांमध्ये मानव विकास कार्यक्रमाच्या निळ्या स्कूल बसेसमध्ये शालेय फेरीत मार्गफलक लावून मानव संसाधन विकास बस ‘फक्त मुलींकरिता’ अशा प्रकारचे फलक निळ्या बसेसमध्ये लावण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी मानव विकास समितीचे सदस्य नरेश जैन यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र देऊन केली आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील मुलींना गावापासून शाळेपर्यंत ने-आण करण्याकरिता शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी सात बसेस दिल्या आहेत. शासनाने एसटी महामंडळाला बसेस विकत घेऊन दिल्या असून प्रती बसमागे वर्षाला सात लाख चार हजार रूपये देखभाल खर्च म्हणून शासन देते. या निळ्या बसेस फक्त मुलींकरिता चालविण्यात यावे, असे स्पष्ट आदेश असतानासुध्दा नियमांना धाब्यावर ठेवून एसटी महामंडळचे अधिकारी शालेय फेरीत मुली व्यतिरिक्त मुलांना व इतर व्यक्तींनासुध्दा बसवितात. त्यामुळे या निळ्या बसेसच्या उद्देशाला एसटी महामंडळ काळीमा फासत असल्याचे दिसून येते.
वारंवार या बसेस फक्त मुलींकरिता चालविण्यात यावे, अशी मागणी जैन यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना करूनसुध्दा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता नरेश जैन यांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र देऊन ‘मानव विकास बस फक्त मुलींसाठी’ असा फलक प्रत्येक स्कूल बसमध्ये लावण्यात यावे व मार्गफलक लावण्यात यावे. जेणेकरून शासनाच्या योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होईल. त्यामुळे शालेय फेरीत कोणतेही वाहक व चालक विद्यार्थिनींसोबत इतर प्रवाशांची वाहतूक करणार नाही, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)