मानव विकासच्या बसेस आता सामान्य प्रवाशांच्या सेवेत
By Admin | Updated: April 25, 2015 01:14 IST2015-04-25T01:14:15+5:302015-04-25T01:14:15+5:30
मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या बसेसचे १८ एप्रिलपर्यंत ठराविक २१५ दिवस पूर्ण झालेले आहेत.

मानव विकासच्या बसेस आता सामान्य प्रवाशांच्या सेवेत
गोंदिया : मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाऱ्या बसेसचे १८ एप्रिलपर्यंत ठराविक २१५ दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे गोंदिया आगारातील मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण २० बसेस आता १९ एप्रिलपासून प्रवाशी सेवेसाठी धावत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी दिली आहे.
शाळांना सुट्टी लागल्यानंतर मानव विकास कार्यक्रमाच्या बसेस निव्वळ उभ्या ठेवता येत नाही. शिवाय गोंदिया आगाराला अतिरिक्त बसेसची गरज आहे. त्यामुळे विविध मार्गावर या बसेस आता धावू लागल्या आहेत. याशिवाय उन्हाळी नियोजनासाठी काही बंद असलेल्या फेऱ्यासुद्धा २० एप्रिलपासून सुरू करण्यात आल्या आहेत.
यात नवीन सुरू करण्यात आलेली गोंदिया-अमरावती बस गोंदिया आगारातून सकाळी ९.१५ वाजता सुटते. ही बसफेरी नागपूर-काटोल-मोर्शी मार्गे धावत आहे. गोंदिया-पूलगाव बसफेरी वर्धा मार्गे धावत आहे. गोंदिया-आर्वी बसफेरी तळेगाव मार्गे धावत आहे. गोंदिया ते नागपूर तीन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असून साकोली मार्गे दोन तर तुमसर मार्गे एक बस धावत आहे. आमगाव ते देवरी बसफेरी सुरू करण्यात आली असून कोहमारा ते देवरी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सालेकसा तालुक्यातील खेडेपार येथे गोंदिया आगाराच्या बसेसच्या दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कामठा व गिरोला मार्गावर प्रत्येकी दोन-दोन फेरा वाढविण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्यात प्रवाशी संख्या वाढल्यास गोंदिया-आमगाव चार नॉन स्टॉप फेऱ्या सुरू करण्यात येतील, असे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी सांगितले आहे. शिवाय गोंदिया-बालाघाट मार्गे सुरू असलेल्या बसफेऱ्या एक फेरी सोडून सर्व नॉन स्टॉप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
२० एप्रिलपासून नागपूरला जाण्यासाठी गोंदिया-बालाघाट-नागपूर बसफेरीचा शुभारंभ करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)