प्रीमियम तिकिटाच्या नावावर अजून किती दिवस भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST2021-07-29T04:29:36+5:302021-07-29T04:29:36+5:30

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून बंद झालेल्या लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. तर रेल्वे ...

How many more days in the name of premium tickets | प्रीमियम तिकिटाच्या नावावर अजून किती दिवस भुर्दंड

प्रीमियम तिकिटाच्या नावावर अजून किती दिवस भुर्दंड

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून बंद झालेल्या लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. तर रेल्वे विभागाने विशेष रेल्वे गाड्या सुरू ठेवल्या असून त्यासाठी प्रीमियम तिकीट दर आकारले आहेत. यामुळे तिकिटाचे दर दुप्पट झाले असून प्रवाशांना याचा वर्षभरापासून फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रीमियम तिकिटाच्या नावावर अजून किती दिवस भुर्दंड सहन करावा लागणार असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

गोंदिया जिल्हा हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर असून गोंदिया रेल्वेस्थानक हे प्रमुख स्थानक आहे. लॉकडाऊनपूर्वी या रेल्वे स्थानकावरून दररोज दीडशेवर गाड्या जात होत्या. आता ही संख्या ४० वर आली आहे. यातही लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद आहे. केवळ विशेष रेल्वे गाड्या सुरू आहे. लोकल आणि पॅसेंजर गाड्यांचे तिकीट कमी असून प्रवासाच्या दृष्टीने या गाड्या प्रवासी आणि छोट्या व्यावसायिकांना सोयीच्या ठरत होत्या. या गाड्या म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारची लाईफ लाईनच होत्या. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून या गाड्या बंद असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब प्रवाशांना एसटी व इतर खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी तिकिटासाठी दुप्पट पैसे माेजावे लागत आहे. राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून एसटीची वाहतूक सुध्दा सुरळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे विभागाला लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची अडचण काय असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

....................

ऑगस्टमध्ये लोकल, पॅसेंजरची शक्यता कमी

कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला असला तरी रेल्वे विभागाने १ ऑगस्टपासून पॅसेंजर, लोकल आणि इतर रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्याचे कुठलेच नियोजन केलेले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात सुध्दा लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

............

या गाड्या त्वरित सुरू करा

गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-बालाघाट, गोंदिया-जबलपूर, गोंदिया-नागपूर, गोंदिया-इतवारी, गोंदिया-दुर्ग, गोंदिया- बैरोनी आदी त्वरित सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या गाड्या बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवासी आणि भाजीपाला विक्रेते व छोट्या व्यावसायिकांची अडचण झाली आहे.

............

कोरोनाचा संसर्ग विशेष गाड्यात होत नाही का

रेल्वे विभागाने कोरोना संसर्ग सांगत सध्या कोरोना-अमृतसर, जबलपूर-चांदाफोर्ट, छत्तीसगड एक्सप्रेस, समता एक्सप्रेस, अजमेर-पुरी या विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहे. या गाड्यांमध्ये सुध्दा प्रवाशांची गर्दी होते. मग यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का? केवळ लोकल आणि पॅसेंजर गाड्यांमधूनच कोरोनाचा संसर्ग पसरतो का असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

.............

कोट :

कोरोनाच्या नावावर मागील दीड वर्षांपासून लोकल, पॅसेंजर आणि इतरही रेल्वे गाड्या बंद आहेत. तर विशेष रेल्वे गाड्यातून प्रवास करण्यासाठी दुप्पट प्रवास भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने या गाड्या त्वरित सुरू करण्याची गरज आहे.

- विशाल आगलावे, प्रवासी,

.........

कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असून सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. तर एसटीची वाहतूक सुध्दा पूर्ववत सुरू झाली आहे. मग रेल्वे गाड्या सुरू करण्यास रेल्वे विभागाला नेमकी अडचण काय हे समजण्यापलीकडे आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेता पॅसेंजर आणि लोकल गाड्या त्वरित सुरू कराव्यात.

- दिनेश गायगोले, प्रवासी

Web Title: How many more days in the name of premium tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.