हाऊसफुल्ल ‘एसटी’चे दिवाळी विशेष नियोजन
By Admin | Updated: October 21, 2016 01:38 IST2016-10-21T01:38:22+5:302016-10-21T01:38:22+5:30
दरवर्षी दिवाळीच्या सणात एसटीच्या गोंदिया आगाराकडून प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले जाते.

हाऊसफुल्ल ‘एसटी’चे दिवाळी विशेष नियोजन
स्कूल बसेसही प्रवासी सेवेत : देवरीमार्गे पाच फेऱ्या नागपूरसाठी धावणार
गोंदिया : दरवर्षी दिवाळीच्या सणात एसटीच्या गोंदिया आगाराकडून प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले जाते. यावर्षीसुद्धा गोंदिया आगाराने दिवाळी सुट्ट्यांसाठी अतिरिक्त बसेस चालविण्याचे १० दिवसांचे नियोजन केले आहे. याचा अतिरिक्त आर्थिक लाभही गोंदिया आगाराला दरवर्षीप्रमाणे मिळणार आहे. इतर दिवशी ८ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असणाऱ्या गोंदिया आगाराला दिवाळीत ९ ते ९.५ लाख प्रतिदिवस उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मात्र अनेक पदे रिक्त असल्यामुळे हे नियोजन किती यशस्वी होते याबाबत साशंकता आहे.
गोंदिया आगारातून गोंदिया-नागपूर अशा सात बसेस धावणार आहेत. बस (५२२१-५२२२) गोंदिया-नागपूर-गोंदिया ही बस सकाळी ९ वाजता गोंदियातून सुटेल व व्हाया देवरी होत नागपूरला दुपारी २.४५ वाजता पोहचेल. तर नागपूरवरून ३ वाजता सुटेल व साकोली -कोहमारा मार्गे सायंकाळी ७ वाजता पोहचेल. बस (५२०३-५२०४) गोंदियावरून सकाळी ६.३० वाजता सुटेल व नागपूरला १०.३० वाजता पोहचेल. तर नागपूरवरून सकाळी ११ वाजता सुटेल व व्हाया देवरी ४.१५ वाजता पोहचेल.
पुन्हा गोंदियावरून व्हाया देवरी होत नागपूरला जाणारी बस गोंदियातून सकाळी १०.३० वाजता सुटेल व ३.४५ वाजता नागपूरला पोहचेल. तर नागपूरवरून ४.३० वाजता सुटेल व साकोली-कोहमारा मार्गे रात्री ८.३० वाजता गोंदियाला पोहचेल. तर सकाळी ९.१५ वाजता गोंदियातून सुटणारी बस नागपूरला १.१५ वाजता पोहचेल. ती परतीसाठी नागपूरवरून २.३० वाजता सुटेल व देवरी मार्गे सायंकाळी ७.४५ वाजता गोंदियाला पोहचेल. याशिवाय सकाळी ६ वाजता गोंदियातून व्हाया देवरी नागपूरसाठी बस सुटेल. ती नागपूरवरून १२.१५ वाजता परतीसाठी निघेल व साकोली-कोहमारामार्गे ४.१५ वाजता गोंदियाला पोहोचेल.
याशिवाय गोंदिया आगारातून नागपूरसाठी कोहमारामार्गे दुपारी १२.३० वाजता, तुमसर-भंडारा मार्गे सकाळी ७ वाजता व सकाळी ८ वाजता बसेस सुटतील.
याशिवाय लांब पल्ल्याच्या अंतरासाठी गोंदिया-अमरावती ही बस सकाळी ९.१५ वाजता गोंदियातून सुटेल. साकोली-नागपूर-तळेगाव मार्गे सायंकाळी ५.०५ वाजता अमरावती येथे पोहचेल व तेथे रात्रीला मुक्कामी राहील. यानंतर दुसऱ्या दिवसी सकाळी ६ वाजता अमरावतीवरून सुटेल व दुपारी १.३० वाजता गोंदियाला पोहोचेल.
याशिवाय जिल्ह्यांतर्गतही अर्धा ते पाऊस तासाच्या अंतराने अनेक फेऱ्या होणार आहेत. गोंदिया-सालेकसा, गोंदिया-आमगाव, गोंदिया-गिरोला अशा अनेक फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. याशिवाय दिवाळी सणामध्ये शाळांना सुट्ट्या राहणार असल्याने या कालावधीत मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेसही जिल्ह्यातच प्रवासी सेवेसाठी धावणार आहेत. (प्रतिनिधी)