एकाचे घरकुल दुसऱ्याच्या नावावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:26+5:302021-04-07T04:30:26+5:30
प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील भूषण भय्यालाल फुंडे यांना मागील वर्षी डिसेंबर महिन्यात घरकुल मंजूर करण्यात आले होते. ...

एकाचे घरकुल दुसऱ्याच्या नावावर
प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील भूषण भय्यालाल फुंडे यांना मागील वर्षी डिसेंबर महिन्यात घरकुल मंजूर करण्यात आले होते. यानंतर पंचायत समितीच्या अभियंता आणि ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी फुंडे यांच्या जुन्या घराचे फोटो काढून नेले होते. यानंतर भूषण फुंडेला ३०० रुपयांचे स्टॅम्प पेपर घेवून आमगाव पंचायत समितीत बोलविले. यानंतर पाच दिवसात तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येईल सांगितले. पणे ते जमा झाले नाही त्यामुळे फुंडे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तेव्हा आज येईल उद्या येईल असे सांगितले. पण प्रत्यक्षात पैैसे आले नाही. त्यामुळे पुन्हा विचारणा केली असता तुमचा आयडी नंबर चुकला असल्याचे सांगितले. पण यादीत फुंडे यांचा आयडी नंबर बरोबर असून त्यांच्या नावासमोर खोडतोड करुन दुसऱ्याचे नाव टाकण्यात आले. त्यामुळे फुंडे यांना मंजूर झाले घरकुल दुसऱ्याच लाभार्थ्याला देण्यात आले. हा फुंडे यांच्यावर अन्याय असून त्यांनी याची तक्रार जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे यांच्याकडे केली आहे. न्याय न मिळल्यास पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा भूषण फुंडे यांनी दिला आहे.