अघोषित पार्किंगमुळे रुग्णालयाचा रस्ताच हरवला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST2021-09-23T04:32:27+5:302021-09-23T04:32:27+5:30

देवरी : बऱ्याच वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा परिसर आठवडी बाजाराच्या दिवशी पार्किंग झोन बनलेला असतो; परंतु आता ग्रामीण रुग्णालयाच्या ...

Hospital road lost due to unannounced parking () | अघोषित पार्किंगमुळे रुग्णालयाचा रस्ताच हरवला ()

अघोषित पार्किंगमुळे रुग्णालयाचा रस्ताच हरवला ()

देवरी : बऱ्याच वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा परिसर आठवडी बाजाराच्या दिवशी पार्किंग झोन बनलेला असतो; परंतु आता ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य रस्त्यावरच वाहने उभी असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून, या रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दर मंगळवारी आठवडी बाजार चिचगड रोडच्या कडेला भरतो. दुसऱ्या कडेला ग्रामीण रुग्णालयाचा परिसर आहे. या परिसरात बाजाराकरिता येणारे मोठे वाहन वाहनचालक उभे करीत होते. आता या परिसरात रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने रुग्णालयात जाणारा जुना रस्ता बंद करण्यात आला. तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालया समोरुन रुग्णालयात जाणारा रस्ता तयार करण्यात आलेला आहे; परंतु चक्क याच रस्त्यावर व्यापारी आपले ट्रक उभे करीत असल्याने व या अघोषित पार्किंगमुळे रुग्णालयात जाणारा रस्ताच हरवला, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या ठिकाणचे रुग्णालय असल्याने रुग्णांची संख्या जास्तच असते. अशावेळी ॲम्बुलन्सने रुग्ण आणताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. जर ही अघोषित पार्किंग अशीच राहिली तर एखाद्या रुग्णाला याच रस्त्यावर जीव गमवावा लागू शकतो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ही समस्या नेहमीचीच झाली असल्याने रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद गजभिये यांना विचारणा केली असता, वाहनधारकांवर कारवाई करण्यासंबंधी प्रशासनाशी बोलणे झाले असल्याचे सांगितले.

Web Title: Hospital road lost due to unannounced parking ()