अस्वलांच्या भटकंतीने नागरिकांमध्ये दहशत
By Admin | Updated: June 10, 2015 00:46 IST2015-06-10T00:46:35+5:302015-06-10T00:46:35+5:30
बरबसपुरा गाव परिसरात दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

अस्वलांच्या भटकंतीने नागरिकांमध्ये दहशत
बरबसपुरातील घटना : वन विभागाने पकडण्यासाठी प्रयत्न करावे
काचेवानी : बरबसपुरा गाव परिसरात दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. रानटी डुक्कर व एकल यांची ये-जा नियमित असली तरी अस्वलांची भटकंती प्रथमच दिसून आली आहे.
बरबसपुरा, काचेवानी, मेंदीपूर हे गाव अदानी प्रकल्पाला लागून असून झुडपी जंगल लागूनच आहे. गावच्या आजूबाजूचे परिसर सपाटीकरण केल्यामुळे जंगलातील हिंसक पशू गावाकडे धाव घेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी डुकराने गावात प्रवेश करून तीन स्त्री-पुरूषांना गंभीर जखमी केले होते. गावकऱ्यांनी एकत्रित होऊन त्या डुकरांचा गावातच मुदडा पाडल्याची घटना घडली होती.
गावात आताही डुकरांची ये-जा सुरू असून घरालगत असलेले सुरण व अन्य जमिनीतील कंद खोदून खातात. धान्य पिकांची नासाडी करीत आहेत. जंगली डुक्कर घराशेजारी येत असल्याने अनेक कुटुंबीय भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत.
तीन-चार दिवसांपासून दोन अस्वलांच्या भटकंतीमुळे गावकऱ्यांत तसेच शेतकाम करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सध्या शेतीच्या कामाला सुरूवात झाली असून शेतात मुलाबाळांना सोबत घेऊन महिला वर्ग जात आहे. अशातच दोन अस्वलांना पाहून शेतात काम कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिसरात पाच वर्षांपूर्वीपासून जंगली पशंूच्या भटकंतीमुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. मात्र वनविभागाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. आता अस्वलांच्या भटकंतीमुळे व बरबसपुरा गाव शिवारात त्यांचा वावर असल्याने नागरिक घाबरत आहेत.
पोलीस पाटील बन्सीलाल रहांगडाले यांच्या शेताजवळ सायंकाळी ७.३० वाजता बरबसपुरा-भिवापूर मार्गावर शेतकऱ्यांनी आणि ये-जा करणाऱ्यांनी या अस्वलांना पाहिले. तर रात्रीला बरबसपुरा येथील रहिवाशी मन्साराम उईके यांच्या घर परिसरात बसलेले अस्वल प्रत्यक्ष पाहण्यात आले. मात्र त्यांना गावातील नागरिकांनी जंगली भागाकडे पळविण्यात यश मिळविले. वन विभागाने या अस्वलांचा बस्तोबंद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
बंदोबस्ताची मागणी
बरबसपुराचे सरपंच ममता लिचडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन अस्वल आणि एकल हे गावालगत तसेच गावात वावरत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती वनविभागात देण्यात आली असून वनविभागाने तातडीने रोकथाम करण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आल्याचेही त्या बोलल्या.